कवी विजय वासाडे यांच्या ‘गहिरे अंतरंग’ कवितासंग्रहाचा २४ नोव्हेंबरला प्रकाशन सोहळा!

नागपुरात ‘जागर मायमराठी’ राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन

दिग्गज साहित्यिक, कवी आणि साहित्यरसिकांच्या उपस्थितीत मराठी साहित्याचा जागर रंगणार

कामगार टाइम्स वृत्तसेवा | किशोर वासाडे

नागपूर : मराठी साहित्यविश्वात आपल्या काव्यलेखणीने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे टेकाडी (कोयला खदान) येथील प्रसिद्ध कवी व गजलकार विजय वासाडे यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि ‘जागर मायमराठी’ राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथे करण्यात आले आहे.

वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय, नागपूर आणि चारोळी मंच, पुणे (शाखा नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक समाज व कला-विज्ञान संस्था (जुने मॉरिस कॉलेज), नागपूर येथे हा साहित्यिक सोहळा संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. चंद्रकांतदादा वानखडे राहणार असून, ज्येष्ठ कवी मा. शंकर घोरसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर कुंभारे हे स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

याप्रसंगी प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अश्विन झाडे, जीवन मुंगले, सुरेंद्र बुधे, डॉ. नीता कचवे, डॉ. अरुण पवार, पत्रकार किशोर वासाडे, चारोळी मंचचे संस्थापक तुकाराम कांबळे, विनायक चिखलीकर यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक व रसिक उपस्थित राहणार आहेत.

‘गहिरे अंतरंग’मधून काव्यभावनांचा साहित्यिक आविष्कार

कवी विजय वासाडे यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन हा या सोहळ्याचा विशेष आकर्षणबिंदू ठरणार आहे. ‘गहिरे अंतरंग’ या शीर्षकातूनच मानवी भावविश्व, संवेदना आणि जीवनानुभवांचा काव्यमय प्रवास अधोरेखित होतो. या कवितासंग्रहावर प्रसिद्ध कवी, समीक्षक आणि ब्लर्बमास्टर प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ हे आपले भाष्य मांडणार आहेत.

कवितांच्या माध्यमातून मराठी साहित्याचा जागर

‘जागर मायमराठी’ या राज्यस्तरीय कविसंमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेची साहित्यिक समृद्धी, काव्यपरंपरा आणि नव्या काव्यप्रवाहांना व्यासपीठ मिळणार आहे. राज्यभरातील कवी, साहित्यिक आणि साहित्यप्रेमींच्या सहभागामुळे या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी राहुल गवस करणार आहेत. राजेश माहूरकर, हितेश गोमासे, उदय नेवे, लीलाधर दवंडे, निकिता गावंडे, विद्या निनावे तसेच अन्य साहित्यिक मित्र कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत.

कवितासंग्रहाचे प्रकाशन आणि राज्यस्तरीय कविसंमेलन अशा दुहेरी साहित्यिक पर्वातून नागपूरच्या साहित्यविश्वात मराठी भाषेचा समृद्ध जागर घडणार असून, साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


📢 कामगार टाइम्स* बातम्या व जाहिरात संपर्क

किशोर वासाडे : 📲 9423403810

 

0
0

Leave a Reply

Realted News