नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शहराची बकाल अवस्था
नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा बोजवारा!
कामगार टाइम्स वृत्तसेवा | सतीश पांडे
कळमेश्वर : कळमेश्वर शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठांमध्ये फुटपाथवर अतिक्रमणांचा विळखा घट्ट होत असताना पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. काटोल–नागपूर महामार्गापासून बसस्थानक, फुल कॉर्नर, मटन मार्केट चौक आणि बाजार लाईनमधील मातापुरा रोडपर्यंत दुकानदारांनी फुटपाथवर कब्जा केल्याचे चित्र दिसत आहे. कुठे पाणीपुरी व खाद्यपदार्थांचे स्टॉल, कुठे भाजीपाल्याची दुकाने, तर कुठे जाहिरातींचे फलक, दुकानांसमोरील पायऱ्या आणि व्यावसायिक साहित्याने पादचाऱ्यांचे हक्काचे मार्गच गिळंकृत केले आहेत.
परिणामी नागरिकांना फुटपाथ सोडून थेट मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असताना नगरपरिषद प्रशासन नेमके करते तरी काय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

फुटपाथ पादचाऱ्यांसाठी की दुकानदारांच्या मालकीचे?
शहरातील फुटपाथची निर्मिती पादचाऱ्यांना सुरक्षित आणि अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली आहे. मात्र, कळमेश्वरमध्ये त्याच फुटपाथचा वापर व्यावसायिक विस्तारासाठी होत असल्याचे चित्र आहे. अतिक्रमणांमुळे केवळ पादचाऱ्यांची गैरसोय होत नाही, तर रस्त्यांवरील वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत. भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.
अनावश्यक बांधकामे आणि खरेदीवर भर; मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष!
कळमेश्वर नगरपरिषदेच्या कारभाराकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले असता नियोजनाचा अभाव, दूरदृष्टीचा अभाव आणि प्राधान्यक्रमातील गोंधळ प्रकर्षाने जाणवतो. शहराला खऱ्या अर्थाने आवश्यक असलेल्या मूलभूत नागरी सुविधांपेक्षा अनावश्यक बांधकामे, विविध खरेदी आणि दिखाऊ स्वरूपाच्या कामांवर अधिक भर दिला जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
शहरातील फुटपाथ मोकळे ठेवणे, रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे, आरोग्यविषयक सुविधा सक्षम करणे आणि नागरिकांना सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे या बाबींना प्राधान्य मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसत आहे.

नगरसेवकांचा प्रभाव कुठे? पदाधिकाऱ्यांची कार्यक्षमता संशयाच्या भोवऱ्यात!
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे सक्षम पदाधिकारी असणे अपेक्षित आहे. मात्र, शहरातील मूलभूत प्रश्नांची दिवसेंदिवस बिकट होत जाणारी अवस्था पाहता लोकप्रतिनिधींच्या प्रभावी हस्तक्षेपाचा आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेचा अभाव जाणवत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
केवळ बैठका, प्रस्ताव आणि कागदोपत्री नियोजन यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामांची गुणवत्ता, नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा आणि संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. विशेषतः शहरातील महत्त्वपूर्ण नागरी सुविधांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर तसेच त्यांच्या अधीनस्थ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचा प्रभावी वचक असणे आवश्यक आहे. मात्र, कामांचा दर्जा, देखभाल, स्वच्छता आणि जबाबदारी याबाबत ठोस नियंत्रण दिसत नसल्यास त्याचा फटका थेट नागरिकांनाच बसतो.

सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्यव्यवस्थेचेही तीनतेरा!
फुटपाथवरील अतिक्रमण हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून शहराच्या एकूण नागरी व्यवस्थेतील त्रुटींचे प्रतिबिंब आहे. सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधांची परिस्थितीही याच प्रशासकीय उदासीनतेकडे बोट दाखवते. शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असताना स्वच्छतेच्या कामांवर नियमित देखरेख, कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करणे आणि कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

पाणीपुरी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा; अतिक्रमणमुक्त बाजारपेठेचे नियोजन करा!
शहरातील पाणीपुरी विक्रेते, भाजीपाला विक्रेते आणि अन्य लहान व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. त्यामुळे केवळ अतिक्रमण हटवून प्रश्न संपणार नाही. विक्रेत्यांसाठी स्वतंत्र आणि नियोजित जागा उपलब्ध करून देणे, आवश्यकतेनुसार नवीन मार्केटमध्ये स्थलांतराची व्यवस्था करणे आणि बाजारपेठेतील वाहतूक व पादचारी मार्गांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
नगरपरिषदेने आता तरी तात्पुरत्या कारवाई न करता शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठांचे सर्वंकष सर्वेक्षण करावे. फुटपाथ अतिक्रमणमुक्त करावेत, सार्वजनिक स्वच्छतेची नियमित तपासणी करावी आणि संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी.

कळमेश्वर शहराचा विकास नागरिकांच्या सोयीसाठी – शहराला आता दिखाऊ विकासाची नव्हे, तर नियोजनबद्ध, उत्तरदायी आणि नागरिककेंद्रित प्रशासनाची गरज आहे. नगरपरिषद प्रशासनाने या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष कृती करावी, हीच कळमेश्वरकरांची अपेक्षा!
📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईल वर, थेट आपल्या गावातून
सतीश पांडे : 📲 9561480227




