तुमसर तालुक्यातील 3 एप्रिल रोजी सकाळपासून हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार आकाशात ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला होता. त्या धर्तीवर जिल्ह्यात घटनेच्या दिवशी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान पाथरी येथील प्रमोद नागपुरे व मनिषा पुष्पतोडे हे स्वतःच्या शेतावर वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी शेतीचे काम करण्यासाठी शेतावर गेले होते. शेतावर काम करत असताना रिपरिप पावसाला सुरुवात झाल्याने दोघेही शेतालगत असलेल्या झाडाखाली असलेल्या झोपडीत पावसापासून बचावासाठी गेले असता अचानकपणे आकाशात विज कडाडली आणि विज झाडाखाली असलेल्या झोपडीवर पडली. यात दोघेही विजेच्या धक्क्याने जागिच ठार झाले.
मनिषा पुष्पतोडे यांच्या मृत्यू पश्चात पती, दोन मुले, सासू, सासरे आहेत तर प्रमोद नागपुरे यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान येथिल सरपंच विद्या कोहरे, उपसरपंच रुषीकुमार खुणे हे देखील घटनास्थळी दाखल होत सदर घटनेची माहिती तहसीलदार, तलाठी, पोलीस स्टेशन गोबरवाहीला देण्यात आली.
दरम्यान घटनास्थळी पोलीस,तलाठी, यांनी घटनास्थळाचा पंचानामा करु़न मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेची नोंद गोबरवाही पोलीसात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.