रसायनयुक्त दूषित पाण्याने ‘वरोडा’ गावावर भीतीचे सावट
काटा वृत्तसेवा I इरशाद दिवाण
कळमेश्वर: तालुक्यातील कळमेश्वर-ब्राम्हणी शहर, वरोडा, झुनकी, सावळी, सिंदी, धुरखेडा, बोरगाव सह आजूबाजूच्या गावांतील हजारो नागरिक रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे त्रस्त झाले आहेत. वरोडा गावालगत वाहणाऱ्या मोरधाम नदीच्या पात्रात कळमेश्वर एमआयडिसी तील कंपन्यांमधून रसायनयुक्त दूषित पाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. परिणामी नदीचे पाणी काळे, विषारी, दूर्गंधीयुक्त व फेसाळलेले पूर्णतः दूषित झाले आहे. त्याचा दुष्परिणाम नागरिकांचे आरोग्य, पाळीव जनावरे व परिसरातील शेतजमिनींवर झाला असून संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कळमेश्वर एमआयडीसीतील कारखान्यांमधून विषारी, अशुद्ध, वापरलेले पाणी व रासायनिक टाकावू घटक खुलेआम नदीमध्ये सोडल्यामुळे पाणी पिण्यासाठी व इतर महत्वाच्या वापरासाठी अंत्यंत धोक्याचे झाले आहे. हे विषारी पाणी पिण्यास जनावरेंही धजत नाही. हे विषारी पाणी पिल्याने पाळीव बक ऱ्या व दुभती जनावरे मेल्याची नागरिकांची ओरड आहे. या पाण्यातील जलचर जीवजंतू व मासे मरून वर तरंगतांना नेहमीच आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे.
परिसरातील 80 हजारावर नागरिकांचे जीवन असुरक्षीत
परिसरातील कळमेश्वर-ब्राम्हणी शहर वगळता इतर कोणत्याही गावांत पिण्याच्या पाण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. नाइलाजाने नागरिकांना पिण्यासाठी याच दुषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करावा लागतो. हेच पाणी नागरिक व जनावरांसाठी वापरत असल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून पाण्यात हा बदल जाणवू लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच् नदीच्या पात्रात गावाची पाणीपुरवठा योजना असून नागरिकांना हेच दुषीत पाणी प्यावे लागत आहे. महत्वाचे म्हणजे तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतकडे जलशुद्धीकरणाची व्यवस्था नाही. नाममात्र भेसळयुक्त ब्लिचींग पावडर तेही एक दिवसाआड विहीरींमध्ये टाकल्याने दुषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचे दुष्परिणाम यत्कींचीतही कमी होत नाही. परिणामी गावांतील आबालवृद्ध चर्मरोंगांसह, अतिसार, काॅलरा, मलेरिया तसेच विवीध संसर्गजन्य रोगांनी त्रस्त आहेत. नागरिकांना आपल्या लहान मुलांच्या व कुटूंबाच्या आरोग्याची व जीवाची चिंता भेडसावत असून आता ग्रामस्थ आरपारची लढाईसाइी सज्ज आहेत. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरोडा ग्रामपंचायतने प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधितांवर तत्काळ कठोर कारवाईची मागणी वारंवार करूनही अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नाही.
दूषित पाण्याविरोधात ग्रामस्थांचा एल्गार…
नागरिकांच्या जीवावर उठलेल्या दोषी कारखान्यावर कठोर कारवाईसह कळमेश्वर औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून रसायनयुक्त पाणी नदीत सोडण्याचे तात्काळ बंद करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. शासनाने प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून पिण्याचे पाणी जाणिवपूर्वक विषारी केल्याप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच नुकसानग्रस्त ग्रामपंचायतींना नुकसान भरपाईपोटी ‘जलशुद्धीकरण संयंत्र’ तातडीने बसवून देण्याची मागणी केली आहे. ग्रामिण दुषित पाण्याच्या विरोधात आंदोलनासाठी सज्ज असून सात दिवसात दुषित पाण्याचा प्रश्न निकाली न निघाल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहीती वरोडा ग्रा. पं. च्या सरपंच संगिता वासनिक यांनी दिली आहे.
कळमेश्वर एमआयडीसीतील कंपनीतून सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, शासनाने, संबंधीत प्रदूषण नियंत्रण मंडळासह सर्व विभागांनी ग्रामवासियांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. अशी आग्रहाची विनंती, वरोडा ग्रामपंचायतच्या सरपंच संगिता वासनिक, उपसरपंच हिरालाल डाखोळे, घनश्याम खडसे, मिलिंद राऊत, गीता हिवरे, सुनीता घोरगडे, प्रतिभा काकडे, पुंडलिकराव बांबल, शांताराम हिवरे, सावंगीचे सरपंच प्रवीण राऊत, खुशाल खडसे, प्रमोद काकडे इ. सह शेकडो नागरिकांनी केले आहे.















