कळमेश्वर तालुक्यात धान्याचा लाभ घेणाऱ्यांची ई-केवायसी मोहीम
काटा वृत्तसेवा I कळमेश्वर : तालुक्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत धान्याचा लाभ घेणाऱ्यांची ई-केवायसी मोहीम राबविण्याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय, मुंबई यांनी सूचित केले आहे. तालुक्यातील मृत लाभार्थी, लग्न होऊन गेलेल्यांची व स्थलांतरित कुटुंबाची शिधापत्रिका ही अद्यापही कार्यान्वित दिसत असल्याने अशा अपात्र शिधापत्रिका लाभार्थ्यांचे नाव शिधापत्रिकेतून रद्द करून खरे गरजू लाभार्थी या योजनांचा लाभ घेऊ शकतील, यासाठी ही कारवाई केली जात आहे.
या अनुषंगाने प्रत्येक गावपातळीवरील रास्त भाव दुकानदाराला त्यांच्या दुकानास जोडलेल्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी मोहीम कळमेश्वर तालुक्यात राबविण्यात येत आहे. ही मोहीम पूर्णपणे निःशुल्क असून, फक्त गावातील रास्त भाव दुकानातच ई-पॉस मशीनद्वारे ई-केवायसी करण्यात येईल.
तसेच ई-केवायसीदरम्यान कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास तालुका निरीक्षण अधिकारी मंगेश ढवळे यांच्याशी संपर्क साधावा सोबतच सर्व लाभार्थ्यांनी या कामास तत्परतेने योग्य प्रतिसाद द्यावा, असे आवाहन तहसीलदार विकास बिक्कड यांनी काल प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.












