माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिला मोठा ‘सामाजिक व राजकीय संदेश’

डॉ. हेडगेवार आणि बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आश्चर्यकारक साम्य : RSS च्या विजयादशमी उत्सवात रामनाथ कोविंद यांचे वक्तव्य

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. संघाच्या शताब्दी स्थापना दिनानिमित्त त्यांचे व्यासपीठावर आगमन हे फक्त औपचारिकतेपुरते मर्यादित नव्हते, तर त्यातून एक मोठा सामाजिक व राजकीय संदेश देण्यात आला. नागपूरात दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथम दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. 1956 मध्ये डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारलेली हीच ती ऐतिहासिक भूमी. कोविंद यांनी या ठिकाणी प्रार्थना करून नंतर आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
                         आपल्या भाषणात त्यांनी आंबेडकर, हेडगेवार, संत तुकाराम, संत रविदास, बिरसा मुंडा आदी समाजसुधारक आणि दलित-महात्म्यांचा उल्लेख करत एकात्मतेचा संदेश दिला. रामनाथ कोविंद यांनी व्यासपीठावरून सर्वांत जास्त भर दिला तो म्हणजे जातिवाद आणि छुआछूत नसलेला संघ यावर. गेल्या काही वर्षांत विरोधकांकडून संघ आणि भाजपवर ‘दलित विरोधी’ असल्याचे आरोप सातत्याने केले जात होते. विशेषतः 2019 च्या लोकसभा निवडणुकीत याचा तोटा भाजपला बसल्याचे राजकीय समीक्षकांचे म्हणणे आहे.

                          अशा पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती व देशातील सर्वांत मोठ्या दलित नेत्यांपैकी एक असलेल्या रामनाथ कोविंद यांची उपस्थिती हा एक प्रकारे प्रतिउत्तर मानले जात आहे. त्यांनी आपल्या भाषणात संघाने कधीही जातिवादाला खतपाणी घातले नाही, उलट सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे, असा ठाम दावा केला. संघात ऊंच-नीच नाही, छुआछूत नाही. येथे सर्व एकसमान आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी संघप्रमुख मोहन भागवत यांना दूरदर्शी सामाजिक वैज्ञानिक संबोधत त्यांचे विशेष कौतुक केले.

                          आपल्या भाषणात कोविंद यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अधोरेखित केले. संविधानामुळे एका सामान्य व्यक्तीला राष्ट्रपतीपदावर पोहोचता आले, हे त्यांनी आवर्जून नमूद केले. तसेच आपण आधी भारतीय आणि नंतर इतर काही आहोत, असा आंबेडकरांचा संदेशही त्यांनी जनतेसमोर पुन्हा ठेवला. त्यांनी संत तुकाराम, संत रविदास, महात्मा फुले, भगवान बिरसा मुंडा यांसारख्या महान विभूतिंचा उल्लेख करून, समाजातील विविध घटकांना संघ कसा एकत्र आणतो हे स्पष्ट केले. एकात्मतेवर भर देताना त्यांनी म्हटले की, जिथे एकता आहे तिथे अस्मिता आहे, आणि जिथे विभागणी आहे तिथे पतन आहे. डॉ. हेडगेवार आणि बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आश्चर्यकारक साम्य असल्याचे ते म्हणाले.

दलित संगम रॅलीचा उल्लेख

                         राजकीय दृष्टिकोनातून पाहता, कोविंद यांचा हा दौरा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण गेल्या काही काळापासून दलित समाजात भाजपची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संघावर दलित समाजाला उपेक्षित ठेवण्याचे आरोप वेळोवेळी झाले, परंतु कोविंद यांच्या भाषणातून त्या सर्व आरोपांना थेट प्रत्युत्तर देण्यात आले. त्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या 2001 च्या लाल किल्ल्यावर झालेल्या दलित संगम रॅलीचा उल्लेख करत सांगितले की, आमचे सरकार मनुस्मृतीवर नाही तर भीमस्मृतीवर म्हणजेच संविधानावर चालते. हा संदेश समाजात पोहोचणे ही आजच्या राजकीय समीकरणात भाजप व संघासाठी अत्यंत महत्त्वाची बाब ठरणार आहे.

दलित समाजाचा विश्वास परत मिळवणे हा उद्देश

                         रामनाथ कोविंद यांचे भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर सामाजिक समरसतेचा आणि राजकीय भविष्याचा संदेश होते. दलित, मागासवर्गीय आणि उपेक्षित घटकांना थेट संबोधित करत त्यांनी संघातील सर्वसमावेशकतेचा गौरव केला. संघ समाजसुधारणेसाठी कायम काम करीत आला आहे आणि पुढेही करीत राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे संघाविषयी समाजातील गैरसमज दूर होणे, तसेच दलित समाजाचा विश्वास परत मिळवणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश स्पष्टपणे दिसून आला. शताब्दी महोत्सवात माजी राष्ट्रपतींची उपस्थिती ही केवळ ऐतिहासिक नव्हे, तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजप-आरएसएससाठी अत्यंत रणनीतिक पाऊल असल्याचे मानले जात आहे.

आम्ही पहलगाम हल्ल्याला पूर्ण तयारीने प्रत्युत्तर दिले : मोहन भागवत

                         राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी सांगितले की, “पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदूंना त्यांचा धर्म विचारून मारले. आमच्या सरकारने आणि सैन्याने त्यांना प्रत्युत्तर दिले. या घटनेने आम्हाला मित्र आणि शत्रू यांच्यात फरक करायला शिकवले.
                         ते म्हणाले की, यानंतर, आम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये विवेकी राहावे लागेल. या घटनेने आपल्याला शिकवले की आपल्या मनात सर्वांबद्दल मैत्रीपूर्ण भावना असल्या तरी, आपल्याला स्वतःच्या सुरक्षेसाठी अधिक सतर्क आणि सक्षम राहावे लागेल. गुरुवारी नागपूरमध्ये विजयादशमीनिमित्त आयोजित संघाच्या शताब्दी समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांनी हे विधान केले. आपल्या ४१ मिनिटांच्या भाषणात त्यांनी समाजात होत असलेले बदल, सरकारांचा दृष्टिकोन, लोकांमधील अशांतता आणि शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या अशांततेचा उल्लेख केला.
                        यापूर्वी, भागवत यांनी संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहिली आणि नंतर शस्त्रपूजन केले.

0
0

Leave a Reply

Realted News