“अकलेचं दिवाळं निघालं; भाजपला थेट विजयी घोषित करा!” वडेट्टीवारांचा सडकून हल्ला

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर वडेट्टीवारांचा सडकून हल्ला
“अकलेचं दिवाळं निघालं; भाजपला थेट विजयी घोषित करा!”

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील गोंधळ अधिकच वाढत असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. “निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालं आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. मतमोजणी पुढे ढकलल्याने निर्माण झालेल्या अनिश्चिततेला आयोगच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

मतमोजणी पुढे ढकलल्याने संताप
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडले. 3 डिसेंबरला मतमोजणी नियोजित होती. मात्र, हायकोर्टाच्या आदेशामुळे मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रात असंख्य निवडणुका झाल्या, पण असा पोरखेळ कधीच झाला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, असे स्पष्ट सांगितले होते. तरीही आयोगाने कोणताही अभ्यास न करता घाईघाईत तारखा जाहीर केल्या. त्यामुळेच हा सावळा गोंधळ झाला.”

आयुक्त कोणाच्या इशाऱ्यावर?
निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही त्यांनी संशय व्यक्त केला. “आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त कोणाच्या इशाऱ्यावर आदेश काढतात, हे आम्हाला ठाऊक आहे. गेल्यावेळी 379 जागा रिक्त राहिल्या, आता परत तशीच वेळ आली आहे. कोर्टाचा आदेश आणि परिस्थिती यांचा नीट विचार न करता आयोगानेच हा गोंधळ घातला,” असा आरोप त्यांनी केला.

“भाजपला थेट विजयी घोषित करा!”
केंद्र-राज्य सरकार आणि आयोगाच्या भूमिकेवर टीका करत वडेट्टीवार म्हणाले, “सात-आठ वर्षांनी निवडणुका होत आहेत, तरीही त्या सुरळीत होत नाहीत. उद्या ईव्हीएममध्ये फेरफार झाली तर जबाबदार कोण? जर सगळं भाजपच्या मनाप्रमाणेच चालणार असेल, तर निवडणुका घेण्याची नाटकं कशाला? भाजपला थेट विजयी घोषित करून टाका.”
देशातील परिस्थिती हुकूमशाहीकडे नेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ओबीसी आरक्षणावर सरकारला सवाल
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 27 टक्के आरक्षणाच्या दाव्याचे खंडन करत वडेट्टीवार म्हणाले, “27 टक्के आरक्षण दिलं, तर ते आहे कुठे? आमच्या काळात बांठिया आयोग नेमला तेव्हा टीका झाली; आता ओबीसींच्या जागा कमी झाल्या तर त्याला जबाबदार कोण?”
ते पुढे म्हणाले, “कोर्टाने 20 दिवसांत निवडणुका घ्या म्हटलं, तरी सरकारने विरोध केला नाही, कारण त्यांना पराभव दिसत होता. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात 175 जागा येत असल्याचा दावा केला जातो, पण हे सर्व फिक्सिंग आहे आणि लोकांना फसवण्यासाठीच दाखवलं जात आहे.”

— वडेट्टीवारांच्या या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं दिसत आहेत.

0
0

Leave a Reply

Realted News