सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या मदतीने;
बोगस मतदान, पैसा व सत्तेच्या गैरवापराचा आरोप – हर्षवर्धन सपकाळ
मुंबई | नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा कार्यभार गंभीर प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या निवडणुका स्वतंत्र व निष्पक्ष पद्धतीने झालेल्या नसून सत्ताधारी पक्षांच्या विजयामागे निवडणूक आयोगाची अप्रत्यक्ष मदत महत्त्वाची ठरल्याचा दावा त्यांनी केला.
निवडणूक निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला. मतदार यादीतील त्रुटी, वारंवार तारखा बदलणे, बोगस मतदान, दडपशाही तसेच पैशाचा आणि सत्तेचा प्रचंड गैरवापर झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. सत्ताधारी पक्षांनी साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा मुक्तपणे वापर केल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपा-नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या कार्यपद्धतीविषयी जनतेत तीव्र नाराजी असताना जाहीर झालेले निकाल हे जनतेचा खरा कौल असल्याचे वाटत नाही, असे मत सपकाळ यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचार वाढला असून सामान्य नागरिकांची कामे रखडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकशाही व संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली करत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप केला.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे मान्य करताना सपकाळ म्हणाले की, तरीही काँग्रेस लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी आपली वैचारिक लढाई सुरूच ठेवेल. “हा संघर्ष एखाद्या निवडणुकीपुरता मर्यादित नसून तो मूल्यांचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले यश हे महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. भविष्यात भाजप आपल्या मित्रपक्षांना बाजूला सारून एकट्याने वाटचाल करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा देखील सपकाळ यांनी केला.









