देवळीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा
अर्धशतकानंतर वर्गमित्रांची गळाभेट;
दहावीच्या बॅचचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात
काटा वृत्तसेवा I श्रीकांत चाफले
देवळी : आयुष्यातील विविध टप्पे पार करत तब्बल अर्धशतकानंतर दहावीच्या वर्गमित्रांनी एकत्र येत स्नेहमिलनाचा आनंद लुटला. एकमेकांची गळाभेट घेत जुन्या आठवणींना उजाळा देत या भेटीचा सुवर्णमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
न. प. माध्यमिक शाळेतील १९७७–७८ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन तुळजाई सभागृहात आयोजित करण्यात आले होते. शालेय शिक्षण पूर्ण करून ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या स्नेहमिलनासाठी दूरदूरून मित्र पत्नींसह उपस्थित राहिल्याने कार्यक्रम भावनिक आणि आनंददायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्गमित्र मनोज टावरी होते. यावेळी माजी प्राचार्य श्रीराम उमरे, वसंतराव तलमले, अशोक पोटदुखे, कुमुदिनी काकडे, हारगोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत शिक्षक तसेच मित्र-मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित गुरुवर्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वर्गमित्रांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आपले अनुभव कथन केले.
यावेळी श्रीराम उमरे यांनी मनोगत व्यक्त करताना नकारात्मक विचारांचा त्याग करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर जीवनात काहीही अशक्य नाही, असे सांगितले. या स्नेहमिलनामुळे स्वतःमध्येही नव्या उर्जेची निर्मिती झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान विविध मनोरंजक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास मांडवकर यांनी केले, तर संचालन डॉ. वंदना चाफले यांनी केले. आभार प्रदर्शन हेमंत धामट यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकांत चाफले, मनोहर बकाने, हरीश पाटील, विठ्ठल जावंदिया, संजय चौधरी, सिद्धार्थ बैस, मनोज टावरी, वासंती तरास, रेखा देवगिरकर, चंदा देशमुख, माला लाकडे, निलिमा मुडे, छाया खाडे, रुकमा शेंडे आदींनी सहकार्य केले.









