एसीबीची धडक कारवाई : ७३ सापळ्यांत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटक
नागपूरमध्ये ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी
नागपूर : प्रतिनिधी
नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेत ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. सन २०२५ व २०२६ या कालावधीत एसीबीने विविध शासकीय विभागांमध्ये तब्बल ७३ सापळा कारवाया करत अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली आहे.
एसीबीने महसूल, पोलीस, ग्रामविकास, वन, शालेय शिक्षण, कृषी, ऊर्जा, सार्वजनिक आरोग्य, जिल्हा परिषद, नगरविकास, पंचायत समिती, आदिवासी विकास, नोंदणी, भूमी अभिलेख, विक्रीकर आणि सहकार अशा जवळपास सर्वच महत्त्वाच्या विभागांमध्ये धडक कारवाया केल्या. या कारवायांमुळे भ्रष्टाचाराचे विस्तृत जाळे उघडकीस आले आहे.

विशेषतः प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) लाचखोरीच्या प्रकरणांमुळे चर्चेत असताना एसीबीने या विभागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मागील दोन वर्षांत आरटीओ विभागात ७ सापळा कारवाया करण्यात आल्या असून, यात वर्ग-१ चे ५ आणि वर्ग-२ चे २ अधिकारी अटकेत आहेत.
एसीबीच्या माहितीनुसार, या सर्व कारवाया कोणत्याही राजकीय दबावाशिवाय निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्या आहेत. तक्रार प्राप्त होताच तिची शहानिशा करून अत्यंत गोपनीयतेने सापळा रचला जातो, ज्यामुळे आरोपींना रंगेहात पकडण्यात यश मिळते.
दरम्यान, एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास भीती न बाळगता तक्रार नोंदवावी. भ्रष्टाचारविरोधातील लढ्यात जनतेचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.









Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0