मृतांत महिला, पती-पत्नीसह दोन मुले, कुटुंब बऱ्हाणपूरचे रहिवासी
काटा वृत्तसेवा I
जळगांव (एरंडोल) : वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी वीजप्रवाह सोडलेल्या तारेच्या धक्क्याने आदिवासी कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांत पती-पत्नीसह दोन मुले यांचा समावेश आहे. मात्र सुदैवाने एक दीड वर्षाची बालिका यातून बचावली. ती पाच जणांच्या मृतदेहाशेजारी गोणपाटावर रडत बसलेली आढळली.
एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात ही घटना बुधवारी ( २० ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. हे सर्वजण वरखडी येथील नातेवाइकांना भेटण्यासाठी पायी निघाले होते. रात्री त्यांना वीज प्रवाह सोडलेली तार दिसली नसल्याने सर्वांना विजेचा धक्का बसला. सकाळी ७ वा. शेतकरी बंडू पाटील हा शेतात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.पोलिसांनी आरोपी बंडू युवराज पाटील यास अटक केली आहे.
बंडू पाटील याने ११ एकर क्षेत्रावर मका पीक लावले आहे. या ठिकाणी वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या चारही बाजूस तार टाकून त्यात शेतातील डीपीवरून अवैध वीजप्रवाह सोडला होता. मंगळवारी रात्री ही तार न दिसल्याने त्याचा धक्का लागून आदिवासी कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अवघ्या दीड वर्षाची चिमुरडी दुर्गा विकास पावरा ही बचावली आहे. दरम्यान, या भागात नीलगाय आणि रानडुकरांमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. त्यापासून पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्याने कुंपणात वीजप्रवाह सोडला होता. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल होणार आहेत.
शेतमालकावर स्वतंत्र ३ गुन्हे
१. पोलिस : तारेतील वीजप्रवाहामुळे निष्पाप ५ जणांचा जीव गेला. यासाठी जबाबदार शेतकऱ्यावर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा.
२. वन विभाग : विजेच्या धक्क्याने दोन रानडुकरांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी वन्यजीव अधिनियमांच्या अनुषंगाने स्वतंत्र गुन्हा दाखल केला.
३. महावितरण : अवैधरीत्या विद्युतप्रवाह सोडल्याने महावितरणही गुन्हा दाखल करणार आहे.
सकाळी घटना उघडकीस आली तेव्हा दीड वर्षाची दुर्गा घटनास्थळी गोणपाटावर रडत बसलेली होती. आजूबाजूला आई-वडील व भाऊ निपचित पडले होते. दुर्गाला एरंडोल पोलिसांनी बाल सुरक्षा समितीकडे संगोपनासाठी सुपूर्द केले आहे.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून मदतीचा प्रस्ताव
मृतांच्या वारसांना मदत मिळावी म्हणून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा अहवाल तयार करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. बचावलेल्या दीड वर्षाच्या बालिकेच्या संगोपनाची जबाबदारी बाल सुरक्षा समितीकडे दिली असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील दुर्दैवी घटना पायी निघाले होते पावरा कुटुंब दीड वर्षाची चिमुरडी बचावली आरोपी शेतमालकाला अटक विविध कलमांन्वये गुन्हे दाखल
आदिवासी पावरा कुटुंब ओसरणी (ता. खकना, जि.बऱ्हाणपूर, म.प्र.) येथील आहे
विकास रामलाल पावरा (४५), पत्नी सुमन पावरा (४२), मुलगा- पवन आणि कवल व सासू (नाव कळले नाही) यांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब ओसरणी (ता. खकना, जि.बऱ्हाणपूर, म.प्र.) येथील आहे.
पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शासन कुंपणाला झटका मशीन लावण्याची परवानगी देते. या मशीनने जीवितहानी होत नाही. झटका बसताच प्राणी शेतात शिरकाव करत नाहीत. मात्र कुंपणात वीजप्रवाह सोडल्यास नाहक बळी जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी असे करू नये.











