गोंडेगावच्या पुनर्वसन आंदोलनावर पोलिसांची मध्यरात्री कारवाई; ग्रामपंचायत सदस्यासह ९ आंदोलक ताब्यात

२० वर्षांपासून प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न; मंडप हटवून पोलिस बंदोबस्तात वेकोलिची माती वाहतूक पुन्हा सुरू

का टा वृत्तसेवा I किशोर वासाडे

कन्हान : पारशिवनी तहसील अंतर्गत कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुने गोंडेगाव येथे सुमारे २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली. गुरुवारी रात्री सुमारे २ वाजता पोलिसांनी आमरण उपोषणस्थळावरून ग्रामपंचायत सदस्य साहिल गजभिये यांच्यासह ९ आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी विविध कलमांनुसार कारवाई केल्याची माहिती आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांमध्ये साहिल गजभिये, सुमित गजभिये, संदेश लांजेवार, अमरदीप गजभिये, अमित गजभिये, रितीक गजभिये, लक्की मेश्राम, उज्वलदास रंगारी आणि मानु पाटील यांचा समावेश आहे. हे सर्व गोंडेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

दोन दशकांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित

गोंडेगावातील ग्रामस्थांनी पुनर्वसनासह विविध मागण्यांसाठी साहिल गजभिये यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सायंकाळपासून आमरण उपोषण सुरू केले होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित आहे.

ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या सुमारे ६ एकर जागेचे वेकोलिने तातडीने समतलीकरण करून पात्र लाभार्थ्यांना भूखंड वाटप करावे, सध्याच्या बाजारभावानुसार वाढीव मोबदला द्यावा, उर्वरित शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करावे आणि भूमिहीन व गैरशेतकरी नागरिकांना रोजगार द्यावा, अशा प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.

ओव्हरब्रिजखाली दगड पडल्याने आंदोलनाला सुरुवात

बुधवारी माती वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून तसेच ओव्हरब्रिजखाली दगड पडल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांनी नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर वेकोलिची माती वाहतूक रोखून आंदोलन सुरू करण्यात आले. सुरक्षेच्या उपाययोजनांसोबतच पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

वेकोलि प्रशासनाशी चर्चा; मात्र तोडगा नाही

आंदोलन मागे घेण्यासाठी वेकोलि कामठी उपक्षेत्राचे उपक्षेत्रीय व्यवस्थापक योगेश कथूरिया, पोलीस अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि आंदोलक यांच्यात चर्चा झाली. तसेच रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांनीही आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्याचे सांगण्यात आले. मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले.

पोलिस बंदोबस्तात मंडप हटविला; माती वाहतूक सुरू

आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळी ग्रामस्थ, महिला, सरपंच मनीषा दलाल तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बुधे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यानंतर दुपारी मोठ्या पोलिस बंदोबस्तात आंदोलनस्थळी उभारण्यात आलेला मंडप हटविण्यात आला आणि त्यानंतर वेकोलिची माती वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

‘दोन दिवसांनंतर कारवाई का?’ — सुरेंद्र बुधे

सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बुधे यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला. ३० सप्टेंबर रोजी दगड पडण्याची घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी आंदोलकांवर कारवाई का करण्यात आली, असा सवाल त्यांनी केला. आंदोलन संपविण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पुनर्वसनाच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम

पोलिसांनी ९ आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आणि आंदोलनाचा मंडप हटवून माती वाहतूक सुरू झाल्यानंतरही गोंडेगावातील ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. नागरिकांची सुरक्षा, पुनर्वसन, योग्य मोबदला, उर्वरित जमिनींचे अधिग्रहण आणि रोजगार या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

आता प्रशासन, वेकोलि व्यवस्थापन आणि गोंडेगावातील ग्रामस्थ यांच्यातील पुढील चर्चेतून सुमारे दोन दशकांपासून प्रलंबित पुनर्वसनाच्या प्रश्नावर काय तोडगा निघतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


बातमी आपल्या 📲 मोबाईलवर, थेट आपल्या गावातून

📢 कामगार टाइम्स* बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – किशोर वासाडे : 📲 9423403810

0
0

Leave a Reply

Realted News