नारा टी पॉईंटवर शेतकऱ्यांचा चक्का जाम; विविध मागण्यांसाठी महामार्गावर आंदोलन

खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन; जय बेलखेडे मित्र परिवाराचा पाठिंबा — नायब तहसीलदार पी.के. आत्राम यांनी स्वीकारले निवेदन

का टा वृत्तसेवा : परमानंद मुदगल

कारंजा (घाडगे) : कारंजा तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, तसेच वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नारा टी पॉईंट येथे चक्का जाम आंदोलन केले. खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला स्वराज्य शेतकरी संघटनेचे नेते जय दादा बेलखेडे व जय बेलखेडे मित्र परिवारासह तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला.

कारंजा तालुक्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने शेती उत्पादनावर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही धोक्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने २५ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत कारंजाचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

शेकडो शेतकरी सकाळी नारा टी पॉईंटवर जमा झाले. हातात विविध मागण्यांचे फलक घेत आंदोलकांनी घोषणाबाजी करत महामार्गावर ठिय्या दिला. त्यामुळे अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलनात महिला शेतकऱ्यांचीही उपस्थिती होती.

या होत्या प्रमुख मागण्या
  • कारंजा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून ट्रिगर-१ मध्ये समावेश करावा.
  • शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी.
  • वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ एक कोटी रुपयांची मदत द्यावी.
  • गोपालकांच्या जनावरांसाठी कारंजा तालुक्यात तातडीने चारा डेपो सुरू करावा.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांसह वर्धा येथूनही अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली होती. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

दरम्यान, आंदोलनस्थळी नायब तहसीलदार पी.के. आत्राम यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी उपविभागीय अधिकारी विनायक पाटील उपस्थित होते. शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


📢 कामगार टाइम्स* बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 
परमानंद मुदगल : 📲 9028162217 

0
0

Leave a Reply

Realted News