“ग्रथंपाल हा केवळ ग्रंथाचा व्यवस्थापक नसून तो वाचकांच्या ज्ञानप्रवासाचा मार्गदर्शक असतो.”
का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर
मोहपा : भारताचे ख्यातनाम ग्रंथालय वैज्ञानिक व भारतीन ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या जयंती निमित्य दरवर्षी ग्रथंपाल दिवस म्हणून साजरा केला जातो. नुकताच (दि. 12 ला) मोहपा येथील बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात, ग्रथंपाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून प्रख्यात मातृसेवा सघं समाजकार्य महाविद्यालय, नागपूर चे ग्रंथपाल डॉ. प्रिन्स अजयकुमार आगाशे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अलका थोडगे होत्या.
कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून तसेच बॅरि. शेषराव उपाख्य नानासहेब वानखेडे व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. धनंजय देवते यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात डॉ. देवते यांनी डॉ. रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच ग्रंथपाल दिवसाचे महत्व विषद करत प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुणे डॉ. आगाशे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, ‘ग्रथंपाल हा केवळ ग्रंथाचा व्यवस्थापक नसून तो वाचकांच्या ज्ञानप्रवासाचा मार्गदर्शक असतो.’
त्यांनी ग्रंथालय विज्ञानातील नवतंत्र, डिजिटल युगातील बदल आणि ग्रथंपालांची भूमीका स्पष्ट केली. ग्रंथांच्या सोबतीने आपल्या जीवनात आमुलाग्र बदल घडवावे, तसेच आपल्या मन, मस्तक आणि मनगटाला बळकटी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले. याप्रसंगी डॉ. आगाशे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
अध्यक्षा प्राचार्या डॉ. थोडगे यांनी संक्षिप्त भाषणात आमच्या महाविद्यालयाच्या विकासात ग्रंथालयाची भूमिका आणि भविष्यातील महाविद्यालयाच्या ग्रंथालयाबाबतचा दृष्टीकोन विषद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोद भालेराव यांनी, तर आभार डॉ. लीलाधर खरपुरीये यांनी केले.
कार्यक्रमाला डॉ. सचिन वैद्य, ग्रंथपाल, आदमने महाविद्यालय सावनेर, डॉ. प्रमोद वडते, डॉ. अजित जाचक, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. अनिता गणोरकर, प्रा. सिद्धार्थ चनकापुरे, प्रा. सचिन काळे, प्रा. शुभम वाघ, प्रा. पवन उमक, ग्रंथालय परिचर अजय अनजंकर, कल्पना देवळे व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रजनी अकर्ते, प्रदीप बगडे, अरविंद डहाट यांनी प्रयत्न केले.