भोंदू अशोक खरात प्रकरण
SIT तपासावर प्रश्नचिन्ह; नाना पटोले यांचा आरोप
मुंबई : भोंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोले यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. खरात हा सरकारशी संबंधित असल्याचा आरोप करत त्यांनी विशेष तपास पथक (SIT) अद्याप ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.
पटोले यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणात काही प्रभावशाली राजकारणी आणि अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. दरम्यान, प्रकरणाशी संबंधित नवनवीन माहिती समोर येत असतानाही SIT कडून कोणत्याही मोठ्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावले गेलेले नाही.


या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना त्यांच्या पदांचा राजीनामा द्यावा लागला असून, पुढे त्यांच्यावरही चौकशीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांसह काही नेत्यांची नावेही चर्चेत आली आहेत.
SIT ने नुकतीच खरातच्या कार्यालयाची झडती घेऊन काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. यात औषधाच्या बाटल्या, कुजलेले पेढे, सॅनिटायझर आणि कार्यालयातील दरवाजावर आढळलेले बोटांचे ठसे यांचा समावेश आहे. या वस्तूंचा वापर करून पीडित महिलांवर दबाव आणला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. न्यायवैद्यक तपासणीत काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले असून, हे पुरावे पुढील कारवाईसाठी निर्णायक ठरू शकतात.

खरातविरोधात राज्यातील विविध भागांत एकूण 16 गुन्हे दाखल असून, त्यापैकी 8 गुन्हे लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत. सध्या तो पोलिस कोठडीत असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असून निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0