जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना थप्पड;
समर्थकांकडून संशयित तरुणांना बेदम मारहाण
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असतानाच गोंधळ
का टा वृत्तसेवा | जयपूर
नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, वाढती बेरोजगारी आणि भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात जयपूर येथे आयोजित आंदोलनादरम्यान CJP (कॉकरोच जनता पार्टी) चे संस्थापक अभिजीत दीपके यांना दोन तरुणांनी थप्पड मारल्याची घटना घडली. या घटनेनंतर संतप्त समर्थकांनी संबंधित दोन्ही तरुणांना पकडून त्यांची मारहाण केल्याने आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शेकडो आंदोलनकर्त्यांची ‘शहीद स्मारका’वर गर्दी
अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते जयपूरमधील ‘शहीद स्मारक’ येथे एकत्र आले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान घडलेल्या थप्पडप्रकरणामुळे परिसरात गोंधळ उडाला.
समर्थकांनी आरोपींना पकडून केली मारहाण
घटनेनंतर दीपके यांच्या समर्थकांनी संबंधित दोन तरुणांना ताब्यात घेत मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत हस्तक्षेप केला. घटनेबाबत पुढील चौकशी सुरू आहे.
आंदोलनात मोबाईल चोरीच्या घटनाही
निदर्शनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार समोर आली. त्यानंतर मंचावरून सर्वांना आपले मोबाईल आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

‘पेपरफुटी थांबवा’, ‘भ्रष्टाचार खपवून घेणार नाही’च्या घोषणा
हातात तिरंगा आणि “पेपरफुटी थांबवा”, “माझ्या देशावर माझे प्रेम आहे; भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही” अशा घोषणा असलेले फलक घेऊन अनेक युवक-युवती आंदोलनात सहभागी झाले होते. काही महिला आपल्या लहान मुलांसहही आंदोलनस्थळी उपस्थित होत्या.
‘हा केवळ एका पक्षाचा नव्हे, तर विद्यार्थी-पालकांचा लढा’
CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, हा संघर्ष कोणत्याही एका संघटनेपुरता मर्यादित नसून देशातील विद्यार्थी, युवा आणि पालकांच्या भवितव्यासाठी आहे. शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना आणि वाढत्या बेरोजगारीविरोधात ही चळवळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘२० जूनला पुन्हा दिल्लीकडे कूच’ : अभिजीत दीपके
घटनेनंतर समर्थकांना संबोधित करत अभिजीत दीपके यांनी आंदोलन मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले. २० जून रोजी पुन्हा ‘चलो दिल्ली’ आंदोलन करण्यात येणार असून, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
प्रतिक्रिया
विश्वंभर चौधरी : “घटना अत्यंत दुर्दैवी”
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी या प्रकाराचा निषेध करत, आंदोलनादरम्यान अशा घटना घडणे दुर्दैवी असल्याचे म्हटले. त्यांनी अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा असल्याचेही सांगितले.
सुषमा अंधारे : “आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची”
सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, कोणतेही आंदोलन असो, हिंसक प्रकाराचे समर्थन होऊ शकत नाही. सरकारने आंदोलनास परवानगी दिली असल्यास आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, असे त्यांनी म्हटले.









