पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पर्यटकांना लुटणारे पोलिस निलंबित
अंमली पदार्थांच्या खोट्या कारवाईची भीती दाखवून ५ लाखांची खंडणी खंडाळा पथकातील ५ अंमलदारांवर निलंबन, सखोल चौकशी सुरू
पुणे | प्रतिनिधी : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना अंमली पदार्थांच्या खोट्या संशयाखाली अडवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या खंडाळा पथकातील दोषी अंमलदारांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांची खात्यांतर्गत सखोल चौकशी सुरू आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना १३ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पर्यटकांना अडवून खंडणीचा प्रयत्न
ही घटना ५ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मौजे ताजे (ता. मावळ) परिसरात घडली. विमाननगर (पुणे) येथील उमेश शर्मा (वय २८) हे आपल्या सहकाऱ्यांसह लोणावळ्याकडे पर्यटनासाठी जात असताना अंबर दिवा लावलेल्या वाहनातील सहा जणांनी त्यांची कार अडवली.
आरोपींनी पर्यटकांकडे अंमली पदार्थ असल्याचा खोटा आरोप करत कारवाईची भीती दाखवली आणि ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर संबंधितांना जबरदस्तीने तळेगाव दाभाडे परिसरात नेऊन एटीएममधून पैसे काढण्यास भाग पाडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक तपासातून पोलिसांचाच सहभाग उघड
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यात महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या खंडाळा पथकातील पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि ट्रॅफिक वॉर्डन यांचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
पाच आरोपी अटकेत; आणखी एका पोलिसाचा सहभाग
या प्रकरणात पोलीस अंमलदार अमोल महादेव ननावरे, तुषार बाळू ढावरे, होमगार्ड तुषार संजय घाडगे, किसन कोंडीबा बांबले आणि ट्रॅफिक वॉर्डन नितेश दिपक चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान खंडाळा पथकातील आणखी एक पोलीस अंमलदार अमोल अशोक वायकर याचाही सहभाग समोर आल्याने त्याच्याविरुद्धही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दोषींवर तात्काळ निलंबन
कर्तव्यावर असताना पर्यटकांना धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याची बाब अत्यंत गंभीर मानत महामार्ग सुरक्षा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी पवार यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे संबंधित पोलीस अंमलदारांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय सर्व आरोपींविरुद्ध विभागीय चौकशी सुरू असून, दोष सिद्ध झाल्यास कठोर शिस्तभंगाची तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
‘कामगार टाइम्स’ विश्लेषण
महामार्ग सुरक्षा दलावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असताना त्याच यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांनी पर्यटकांना लक्ष्य करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणातील सखोल चौकशीमुळे अशा प्रकारच्या संघटित गैरप्रकारांचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून, राज्यभरातील महामार्ग सुरक्षा व्यवस्थेचेही पुनर्मूल्यांकन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






