बाह्य रिंगरोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, वरोडा ग्रामस्थांचा एल्गार

“शेती वाचवा!” वरोडा ग्रामस्थांचा एल्गार

बाह्य रिंगरोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

सहमतीशिवाय जमीन संपादित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप;

शासनाने सक्तीऐवजी शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा, ग्रामपंचायतीची मागणी

कळमेश्वर, प्रतिनिधी : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (NMRDA) प्रस्तावित बाह्य रिंगरोड प्रकल्पासाठी वरोडा परिसरातील शेतजमिनी संपादित करण्याच्या प्रक्रियेविरोधात ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. “जमीन नको, शेती वाचवा” अशी भूमिका घेत ग्रामपंचायत वरोडाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले असून, शेतकऱ्यांच्या स्पष्ट संमतीशिवाय कोणतीही जमीन संपादन प्रक्रिया राबवू नये, अशी ठाम मागणी केली आहे.

                          निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या धोरणानुसार संबंधित भूधारकांची लेखी संमती घेण्याची तरतूद आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी अद्याप कोणतीही संमती दिलेली नसतानाही त्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया पुढे नेली जात असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.

                         ग्रामपंचायतीने आपल्या निवेदनात संबंधित भूधारकांना कायदेशीर पर्याय, संमतीपत्राची प्रक्रिया आणि सुनावणीची संपूर्ण माहिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, अन्यथा तीव्र लोकआंदोलन उभे राहू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

                         वरोडा परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शेती हीच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा एकमेव आधार आहे. विकासाच्या नावाखाली सुपीक जमीन हिरावून घेतली गेल्यास अनेक कुटुंबांचे भविष्य अंधारात जाईल. त्यामुळे शासनाने विकास आणि शेतकऱ्यांचे हित यामध्ये समतोल साधत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

                          दरम्यान, ग्रामपंचायतीने हे निवेदन उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार विकास बिक्कड यांना सादर करून शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविल्या आहेत. आता प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते आणि पुढील निर्णय काय घेतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

                         यावेळी ग्रामपंचायत वरोडा येथील सरपंच संगीता वासनिक, उपसरपंच हिरालालजी डाखोरे, घनश्यामजी खडसे, दिलीप काकडे, अज्जू पठाण, नरेश राऊत, रोहित हिवरे, सुधाकर काकडे, गजानन डाखोरे, कोठेराम पुसदकर, विलास बेंडे, पुंडलिक बांबल, नरेंद्र डाखोळे, शांताराम हिवरे, नारायण खडसे, बळवंत राऊत, अमोल डाखोळे, इत्यादी अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

0
0

Leave a Reply

Realted News