कळमेश्वरमध्ये देशभक्तीच्या जल्लोषात भव्य तिरंगा बाईक रॅली

कळमेश्वरमध्ये देशभक्तीच्या जल्लोषात भव्य तिरंगा बाईक रॅली

शेतकऱ्यांना एमआयडीसीसाठी जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देणार : आमदार डॉ. आशिष देशमुख

कळमेश्वर, दि. १४ ऑगस्ट : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या पुढाकारातून कळमेश्वर येथे शुक्रवारी भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’च्या घोषणांनी शहराचा परिसर दुमदुमून गेला.

रॅलीत युवक-युवती, शेतकरी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी आमदार देशमुख यांनी “तिरंगा हा स्वातंत्र्य, त्याग, एकता आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे,” असे आवाहन केले.

झेन झी पिढीसाठी रोजगारनिर्मितीचा संकल्प

सावनेर-कळमेश्वर परिसरात उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करण्याचा संकल्प असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथील प्रस्तावित कोलगॅसिफिकेशन प्रकल्प, सावनेर तालुक्यातील सुमारे ६,४०० एकर क्षेत्रातील एमआयडीसी तसेच खत प्रकल्पांमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘शेतकरी माझा दैवत’; योग्य मोबदल्यासाठी ठाम भूमिका

एमआयडीसीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत आमदार देशमुख यांनी ठाम भूमिका मांडली. “शेतकरी हा माझा दैवत आहे. नऊ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीसाठी घेतल्या जात असतील, तर त्यांना योग्य व जास्तीत जास्त मोबदला मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

महसूल विभागाने जमिनीचा दर निश्चित करताना शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा योग्य दर निश्चित करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

रॅलीत आमदार डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अशोक धोटे, प्रिया मानकर, मीना तायवाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी-कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. भाजपच्या सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राच्या आयोजनातून झालेल्या या रॅलीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कळमेश्वरमध्ये देशभक्तीचा उत्साह निर्माण केला.

0
0

Leave a Reply

Realted News