विद्यार्थिनीच्या व्यथेवर जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता; थेट गावात पोहोचून एसटी बस सेवा सुरू

विद्यार्थिनीच्या व्यथेवर जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता; थेट गावात पोहोचून एसटी बस सेवा सुरू

सोशल मीडियावरील व्हिडिओची घेतली दखल; खेतापूर–नागपूर बससेवेचा विद्यार्थिनींच्या हस्ते शुभारंभ

नागपूर : कुही तालुक्यातील दुर्गम खेतापूर येथील विद्यार्थिनीने एसटी बससेवेअभावी शिक्षणासाठी होत असलेल्या अडचणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओची तत्काळ दखल घेत नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी थेट खेतापूर गावाला भेट देत विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर संबंधित यंत्रणेला तातडीने निर्देश देत खेतापूर ते नागपूर एसटी बस सेवा सुरू केली.

७ किलोमीटरचा प्रवास ठरत होता अडथळा

खेतापूर येथील विद्यार्थिनींना माध्यमिक शिक्षणासाठी सुमारे ७ किलोमीटर अंतरावरील डोंगरगाव येथे जावे लागते. मात्र, गावातून नियमित वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नववीत शिकणाऱ्या टीना वैकुंठे हिने व्हिडिओद्वारे ही समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी टीना तसेच तिच्या मैत्रिणींशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बससेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

विद्यार्थिनींच्याच हस्ते बससेवेचा शुभारंभ

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर खेतापूर–नागपूर नवीन एसटी बससेवा सुरू करण्यात आली. यावेळी टीना वैकुंठे आणि तिच्या मैत्रिणींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. प्रशासनाने घेतलेल्या या तत्पर निर्णयामुळे विद्यार्थिनींसह ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

रस्त्याच्या दुरुस्तीचेही निर्देश

गावातील नागरिकांच्या इतर नागरी समस्यांचाही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. खेतापूर ते डोंगरगाव रस्त्याची पाहणी करून रस्ता दुरुस्तीचे काम अमृतकाल योजनेंतर्गत समाविष्ट करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाला सप्टेंबर महिन्यापासून हे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

‘आपली बस’ सेवा विस्तारासाठी प्रयत्न

खेतापूरपर्यंत नागपूर महानगरपालिकेची ‘आपली बस’ सेवा विस्तारित करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी ग्रामस्थांना दिले.

अतिक्रमण आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांबाबतही आश्वासन

गावातील गोपाळ समाजाच्या झुडपी जंगल जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न न्यायालयाच्या निर्णयानुसार नियमानुकूल करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच पाळीव जनावरांवर होणारे वाघांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागामार्फत ठोस नियोजन करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले.

यावेळी स्थानिक आमदार डॉ. संजय मेश्राम, तहसीलदार अमित घाडगे, सरपंच प्रदीप खोब्रागडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

0
0

Leave a Reply

Realted News