नावावर ९ सिम असतील तर नवीन कनेक्शन मिळणार नाही!
DoTचा मोठा निर्णय; तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर आहेत, आजच तपासा—अनधिकृत सिम आढळल्यास त्वरित कारवाई करा
नवी दिल्ली : मोबाईल वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. २४ ऑगस्ट २०२६पासून सिमकार्डच्या नियमांची अंमलबजावणी अधिक कडक होणार आहे. एका व्यक्तीच्या नावावर देशातील बहुतांश भागात कमाल ९ मोबाईल कनेक्शन, तर जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये कमाल ६ कनेक्शन ठेवण्याची मर्यादा आहे. ही मर्यादा आधीपासून अस्तित्वात असून, आता टेलिकॉम कंपन्यांना ती अधिक प्रभावीपणे लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

९ सिम असतील तर १०वे कनेक्शन नाही
एखाद्या व्यक्तीच्या नावावर एअरटेलचे ५, जिओचे ३ आणि व्हीआयचे १, अशी एकूण ९ कनेक्शन असतील, तर त्या व्यक्तीला आता बीएसएनएल किंवा अन्य कोणत्याही कंपनीचे १०वे कनेक्शन घेता येणार नाही. वेगवेगळ्या कंपन्यांची सिमकार्ड असली तरी सर्व कनेक्शन एकत्रितपणे मोजली जातील.
नवीन कनेक्शन देण्यापूर्वी होणार तपासणी
दूरसंचार विभागाने (DoT) टेलिकॉम कंपन्यांना Digital Intelligence Platform (DIP) च्या माध्यमातून ग्राहकाच्या नावावर असलेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती तपासण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. २४ ऑगस्टपासून मर्यादा पूर्ण झालेल्या ग्राहकाला अतिरिक्त सिम देण्यास नकार देण्याची प्रक्रिया लागू होणार आहे.

तुमच्या नावावर किती सिम आहेत? असे तपासा
तुमच्या नावावर तुमच्या माहितीशिवाय सिमकार्ड जारी झाले आहे का, हे सरकारच्या Sanchar Saathi/TAFCOP सुविधेद्वारे तपासता येते. या सुविधेत तुमच्या नावावर नोंद असलेली मोबाईल कनेक्शन्स पाहता येतात आणि अनोळखी किंवा नको असलेले कनेक्शन रिपोर्ट करता येते.
या नियमाने आणखी एक गोष्ट उघड होणार आहे ती म्हणजे जर तुमच्या नावावर अशा नंबर चालू आहे जो तुम्ही कधीच घेतलेला नाही. तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कागदपत्रांचा गैरवापर करुन जारी केलेले मोबाईल कनेक्शनचा वापर सायबर फ्रॉडसह अनेक बेकायदेशीर कामासाठी केला जाऊ शकतो.
Sanchar Saathi – अधिकृत सरकारी पोर्टल
नियमांचा उद्देशकाय?
मोबाईल कनेक्शनचा गैरवापर, बनावट सिम, ओळख चोरी आणि सिमच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीला आळा घालणे हा या व्यवस्थेचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे तुमच्या नावावर वापरात नसलेले किंवा अनोळखी नंबर असल्यास त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणे महत्त्वाचे आहे.
महत्त्वाचे : २४ ऑगस्टपासून ९ सिमची मर्यादा नव्याने लागू होत नाही; तिची अंमलबजावणी अधिक कडक होत आहे. त्यामुळे “उद्यापासून सिम बंद होणार” अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.









