भारताला २१व्या शतकाकडे नेणारे राजीव गांधींचे योगदान मोलाचे — बबलू देशमुख

माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त अमरावती काँग्रेस भवनात अभिवादन; आधुनिक तंत्रज्ञान, संगणक व दूरसंचार क्रांतीला दिली चालना

अमरावती : भारताचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अमरावती येथील काँग्रेस भवनात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी बबलू देशमुख म्हणाले की, भारताला २१व्या शतकात घेऊन जाण्याचे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी राजीव गांधी यांनी मोलाचे योगदान दिले. आधुनिक तंत्रज्ञान, संगणक आणि दूरसंचार क्षेत्राला चालना देऊन त्यांनी भारताच्या विकासाची पायाभरणी केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे देशाने तंत्रज्ञानाच्या नव्या युगात प्रवेश केला.

युवकांना मतदानाचा अधिकार; पंचायतराज व्यवस्थेलाही बळ

राजीव गांधी यांनी युवकांना मतदानाचा अधिकार देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच पंचायतराज व्यवस्थेला बळकटी देणे, प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि देशातील दूरसंचार व्यवस्था सक्षम करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली.

आजच्या डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित भारताची पायाभरणी करण्यामध्ये राजीव गांधींच्या धोरणांचा मोठा वाटा आहे, असे बबलू देशमुख यांनी नमूद केले.

आधुनिक भारताचे स्वप्न साकारण्याचा विचार पुढे नेण्याचे आवाहन

राजीव गांधी यांनी देशाची एकात्मता, प्रगती आणि विकासासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या आधुनिक आणि प्रगतिशील विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी कार्य करावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले.

कार्यक्रमाला हरिभाऊ मोहोड, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, प्रदीप देशमुख, समाधान दहातोंडे, शैलेश गवई, सिद्धार्थ बोबडे, प्रशांत भोयर, धनंजय देशमुख, शेखर दाभणे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी राजीव गांधी यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

0
0

Leave a Reply

Realted News