🚨 BREAKING NEWS
🌾 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
💰 6.36 लाख शेतकऱ्यांना ₹5,086 कोटींची कर्जमाफी
📌 दोन टप्प्यांत 12.58 लाख शेतकऱ्यांना ₹10,115 कोटी
⚠️ अॅग्रीस्टॅक + e-KYC पूर्ण असणे आवश्यक!
एकूण 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचे सरकारचे नियोजन
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महायुती सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली.
या टप्प्यात 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांना एकूण 5 हजार 86 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांना 5 हजार 29 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून आतापर्यंत 12 लाख 58 हजार 243 शेतकऱ्यांना एकूण 10 हजार 115 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.

56 लाख शेतकऱ्यांना लाभ
राज्य सरकारच्या नियोजनानुसार या योजनेचा लाभ एकूण 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये 32 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार असून, 23 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी सरकारकडून सुमारे 40 हजार 980 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण महत्त्वाचे
कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण (e-KYC/Aadhaar Authentication) पूर्ण करणे आवश्यक आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रोहित पवार यांची सरकारवर टीका
दरम्यान, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडून विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे उपस्थित केला आहे.
आंदोलनानंतर कर्जमाफीचा निर्णय
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर विविध शेतकरी संघटनांनी कर्जमाफीसाठी आंदोलने आणि उपोषणे केली. सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्त्वाचे : कर्जमाफीसाठी पात्रता, कर्जाची मर्यादा आणि इतर अटी लागू असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नावाची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया अधिकृत यंत्रणेकडून तपासून घ्यावी.










