मंत्री अशोक उईके यांच्यासोबत 5 तास चर्चा
सरकारने मागितला दोन दिवसांचा वेळ, मात्र विद्यार्थ्यांचा निर्धार कायम
पुणे : पुण्याच्या मांजरी परिसरात विविध 14 प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण 14व्या दिवशीही सुरूच आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढत असताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या 15 जणांच्या शिष्टमंडळासोबत तब्बल पाच तास सविस्तर चर्चा केली. बैठक सकारात्मक झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर अद्याप अंतिम आणि ठोस निर्णय झालेला नाही.
मंत्री उईके यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, सरकारकडून मागण्या मान्य केल्याचे ठोस आणि लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
पाच तासांच्या बैठकीनंतरही तोडगा अधांतरी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी झालेल्या बैठकीत मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. काही मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेणे शक्य असल्याचे संकेत देण्यात आले, तर काही बाबींमध्ये तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया आवश्यक असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
बैठकीनंतर मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगितले. “आमची पोरं-पोरी आपल्या हक्कासाठी बोलू लागली आहेत, याचा मला अभिमान आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. काही तांत्रिक बाबींवर विचार करून निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितल्याचेही त्यांनी सांगितले.
‘लेखी निर्णय द्या, मगच उपोषण मागे’
मात्र, विद्यार्थ्यांनी सरकारच्या आश्वासनावर समाधान न मानता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने सर्व 14 मागण्यांबाबत लेखी निर्णय द्यावा आणि त्यासाठी निश्चित वेळमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
विशेषतः शासकीय सेवा आणि शिक्षण क्षेत्रातील जागा बोगस आदिवासी प्रमाणपत्रांच्या आधारे मिळवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींच्या याद्या जाहीर करून त्यांच्यावर कारवाईचा स्पष्ट निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
प्रकृती खालावल्याने आंदोलनाची चिंता वाढली
सलग 14 दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंदोलनाचा प्रश्न आता केवळ मागण्यांपुरता मर्यादित राहिला नसून, उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. दुसरीकडे, लेखी आश्वासनाशिवाय माघार न घेण्याच्या भूमिकेमुळे सरकारसमोरही आंदोलन सोडवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
राहुल गांधींच्या कार्यक्रमानंतर राज्याचे लक्ष वेधले
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीने विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा आवाज थेट त्यांच्यासमोर मांडला होता. या घटनेनंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची राज्यभर चर्चा सुरू झाली.
त्यातच मांजरी येथे सुरू असलेल्या उपोषणाला 14 दिवस पूर्ण झाल्याने या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आता दोन दिवसांत काय निर्णय होणार?
सरकारने मागितलेल्या दोन दिवसांच्या मुदतीनंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या 14 मागण्यांवर नेमका कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे सरकारकडून चर्चेतून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे विद्यार्थी “लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही” या भूमिकेवर ठाम आहेत.
त्यामुळे येणारे दोन दिवस या आंदोलनासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता असून, सरकार विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन देणार की आंदोलन आणखी तीव्र होणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. — कामगार टाइम्स










