भोजनाच्या गुणवत्तेबाबत विद्यार्थिनींच्या गंभीर तक्रारी; स्वच्छता व सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह, तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींना धमकावल्याचा आरोप
नागपूर : काँग्रेसनगर, धंतोली येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील भोजनाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. वसतिगृहातील विद्यार्थिनींना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये किडे, अळ्या तसेच दूषित पदार्थ आढळत असल्याचा आरोप विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून वसतिगृहातील स्वच्छता व सुरक्षा व्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार, मेसच्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत मागील दोन वर्षांपासून सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र, अनेकदा तक्रार करूनही समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप आहे.
मेसच्या स्वयंपाकघरातील स्वच्छतेवरही प्रश्न
भोजन तयार करताना अन्नसुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. मेसच्या स्वयंपाकघरातील स्वच्छता, भोजनाची गुणवत्ता आणि विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुरक्षा उपायांबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
अशा प्रकारचे दूषित अथवा अस्वच्छ भोजन विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वसतिगृहातील मेसची नियमित तपासणी तसेच अन्नाच्या गुणवत्तेची काटेकोर तपासणी करण्याची मागणी होत आहे.

तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींना धमकावल्याचा आरोप
विशेष म्हणजे, भोजनाच्या गुणवत्तेबाबत आवाज उठविणाऱ्या विद्यार्थिनींना धमकावले जात असल्याचीही तक्रार विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी केली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाने या तक्रारींची निष्पक्षपणे चौकशी करण्याची मागणी होत आहे.
‘समस्या सामंजस्याने सोडवायची होती’
याप्रकरणी महाविद्यालय प्रशासनानेही तक्रारींची दखल घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख यांनी विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार वसतिगृहातील स्वच्छ वातावरण, सुरक्षित व्यवस्था आणि पौष्टिक भोजन उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी भूमिका व्यक्त केली आहे.
विद्यार्थिनींच्या आरोग्याशी तडजोड नको
वसतिगृहातील विद्यार्थिनींना दिले जाणारे भोजन हे त्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याने अन्नाच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेता कामा नये. विद्यार्थिनींच्या तक्रारींची तातडीने चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मेसच्या स्वयंपाकघराची स्वच्छता, अन्नसाठवणूक, भोजनाची गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन यांची संबंधित विभागाकडून तातडीने तपासणी होणार का? याकडे आता विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.











