देशाला ‘समानतेचा अधिकार’ देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

देशाला ‘समानतेचा अधिकार’ देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

— अर्जुन दादारावजी गायकवाड

                        डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव म्हणजेच एक क्रांती आहे. त्यांनी प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी लढण्याची प्रेरणा दिली. माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली.

परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात ठाम निर्धार असेल, तर कोणतेही ध्येय साध्य करता येते, ही प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते. अत्यंत गरिबीतून त्यांनी शिक्षण घेतले आणि प्रचंड संघर्ष केला. त्यामुळेच आज जगभरात त्यांना “Symbol of Knowledge” म्हणून ओळखले जाते.

भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी सर्व नागरिकांना समान हक्क आणि संधी दिली. “राजा हा राणीच्या पोटातून नव्हे, तर मतपेटीतून निर्माण होतो” ही लोकशाहीची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाला एकच मताचा अधिकार देऊन त्यांनी खरी लोकशाही रुजवली.

बाबासाहेबांनी बनवलेला कायदा प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे संरक्षण करतो. तो आई-वडिलांसारखा प्रत्येकाचे रक्षण करतो. त्यांच्या विचारांमध्ये केवळ माणसांचाच नव्हे, तर सर्व जीवसृष्टीचा विचार आढळतो.

विश्वरत्न आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते. ते विद्वान, कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि महान समाजसुधारक होते. त्यांनी लोकशाही, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधुनिक भारताचा पाया रचला.

महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी संसदेत हिंदू कोड बिल मांडले. या बिलामध्ये महिलांना समान हक्क देण्याची तरतूद होती. त्या काळात महिलांना अनेक अन्याय सहन करावे लागत होते—विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता, घटस्फोटाचा अधिकार नव्हता, संपत्तीमध्ये हक्क नव्हता. या अन्यायाविरुद्ध बाबासाहेबांनी आवाज उठवला. मात्र, या विधेयकाला मोठा विरोध झाला. त्यामुळे महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. पुढे कालांतराने या सुधारणा लागू झाल्या आणि महिलांना खरे स्वातंत्र्य व समानता मिळाली. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, हे त्यांच्या संघर्षाचे फलित आहे.

समाजातील अन्यायाविरुद्ध त्यांनी अनेक चळवळी केल्या. महाड येथील चवदार तळे सत्याग्रह हा पिण्याच्या पाण्यासाठीचा लढा होता. त्या काळात दलितांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांनी स्वतः पाणी पिऊन हा तळ सर्वांसाठी खुला केला.

तसेच नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह हा मंदिर प्रवेशासाठीचा ऐतिहासिक लढा होता. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, पण जनावरांना मोकळीक होती. या अन्यायाविरुद्ध बाबासाहेबांनी लढा दिला. हा लढा केवळ मंदिर प्रवेशासाठी नव्हता, तर मानवी सन्मान आणि समतेसाठी होता.

कामगारांसाठीही त्यांनी मोठे योगदान दिले. कामाचे तास १२ वरून ८ केले, भविष्यनिर्वाह निधी (P.F.) योजना सुरू केली, आठवड्याची सुट्टी सक्तीची केली आणि बोनसची तरतूद केली. कामगार हा आधी माणूस आहे, गुलाम नाही, हा त्यांचा ठाम विचार होता.

त्यांनी लिहिलेल्या “The Problem of Rupee” या ग्रंथामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा पाया घातला गेला.

अशा अनेक क्षेत्रांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांनी केवळ कायदेच बनवले नाहीत, तर समाजाला समानता, स्वाभिमान आणि न्यायाने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या कार्यामुळेच आज भारत एक लोकशाही आणि समतावादी राष्ट्र म्हणून उभा आहे.

0
0

Leave a Reply

Realted News