NEET पेपरफुटीप्रकरणी मुख्यमंत्री विजय आक्रमक; परीक्षा बंद करण्याची केंद्राकडे मागणी
पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त; ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप
Vijay यांनी NEET परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत केंद्र सरकारकडे ही परीक्षा कायमची बंद करण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या NEET-UG परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर विजय यांनी केंद्राच्या परीक्षा व्यवस्थेवर जोरदार टीका केली.
विजय म्हणाले की, पेपर लीक आणि परीक्षा रद्द होण्याच्या घटनांमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. NEET लागू झाल्यापासून ग्रामीण भागातील, सरकारी शाळांमधील, तमिळ माध्यमातील तसेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बारावीच्या गुणांवर प्रवेश देण्याची मागणी
मुख्यमंत्री विजय यांनी केंद्र सरकारने NEET परीक्षा रद्द करून राज्यांना MBBS, BDS आणि AYUSH अभ्यासक्रमांच्या राज्य कोट्यातील प्रवेश बारावीच्या गुणांच्या आधारे देण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, NTA ने यावर्षी 3 मे रोजी देशभरातील 5,432 परीक्षा केंद्रांवर NEET-UG परीक्षा घेतली होती. त्यामध्ये देशभरातून 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तमिळनाडूमधील 31 शहरांमध्ये परीक्षा पार पडली असून राज्यातील सुमारे 1.4 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

2024 मध्येही झाला होता पेपर लीक
दरम्यान, NEET परीक्षेतील गैरप्रकारांची ही पहिली घटना नसल्याचे विजय यांनी नमूद केले. 2024 मध्येही पेपरफुटीचे प्रकरण समोर आले होते. त्या वेळी सहा राज्यांमध्ये FIR दाखल करण्यात आले होते आणि नंतर तपास Central Bureau of Investigation कडे सोपविण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्र सरकारने के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. समितीने परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी 95 शिफारसी केल्या होत्या. मात्र, या उपाययोजनांनंतरही पुन्हा पेपर लीकची घटना घडल्याने परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून काही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांमुळे NEET परीक्षा बंद करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0