१२ लाखांच्या लाचेची मागणी करणारा तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; ६.४० लाख रुपये स्वीकारताना अटक
ट्रॅपच्या भीतीने आठ वेळा बदलले भेटीचे ठिकाण; अखेर स्वतःच्या घरासमोरच कारवाई

छत्रपती संभाजीनगर/अंबड, प्रतिनिधी : अवैध वाळू उपसा निर्धोकपणे सुरू ठेवण्यासाठी १२ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण (वय ४७) यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी रंगेहात अटक केली. चव्हाण यांना ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले.
एसीबीच्या माहितीनुसार, अवैध वाळू उपसा प्रकरणात कारवाई न करण्यासाठी आणि संबंधित व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी चव्हाण यांनी १२ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला.
कारवाईची चाहूल लागण्याच्या भीतीने आरोपी तहसीलदाराने तब्बल आठ वेळा भेटीचे ठिकाण बदलल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र अखेर छत्रपती संभाजीनगरातील सातारा परिसरातील स्वतःच्या निवासस्थानासमोर ६.४० लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
अंगझडतीत महागडे साहित्य आणि दागिने जप्त
अटकेनंतर करण्यात आलेल्या अंगझडतीत आरोपीकडून एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल, ॲपल स्मार्टवॉच, पिवळ्या धातूच्या दोन अंगठ्या, एक लॉकेट तसेच ६ हजार ३७० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
घराची झडती सुरू
एसीबीकडून आरोपीच्या निवासस्थानाची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. या धडक कारवाईचे नेतृत्व बीड एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या पथकाने केले.
महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा चर्चेत
दरमहा सुमारे दीड लाख रुपयांचे वेतन मिळत असतानाही लाचेच्या मोहापायी तहसीलदाराला अटक झाल्याने महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, आरोपीच्या मालमत्ता व आर्थिक व्यवहारांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.









