मूलभूत सुविधा अपुऱ्या, मात्र कर वाढीचा प्रस्ताव कायम; अन्यायकारक कर निर्धारण रद्द करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
हिंगणा/निलडोह, दि. ३ नोव्हेंबर : एकीकडे दुष्काळी परिस्थिती, वाढती महागाई आणि रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत असताना दुसरीकडे नगरपंचायत प्रशासनाकडून कर वाढीचा प्रस्ताव पुढे रेटला जात असल्याने निलडोहमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी करण्यात येत असलेल्या कर निर्धारण व प्रस्तावित कर वाढीला निलडोह विकास आघाडीने तीव्र विरोध दर्शविला आहे.
या अन्यायकारक कर वाढीच्या विरोधात विकास आघाडीच्या वतीने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३ नोव्हेंबर रोजी पुन्हा स्मरणपत्र सादर करण्यात आले.
दुष्काळ आणि महागाईच्या दुहेरी संकटात नागरिक
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेती व्यवसायावर संकट ओढवले असून रोजगाराच्या संधीही मर्यादित झाल्या आहेत. त्यातच वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत नागरिकांवर अतिरिक्त कराचा आर्थिक भार टाकणे अन्यायकारक असल्याची भूमिका निलडोह विकास आघाडीने मांडली आहे.
सुविधा अपुऱ्या, मग कर वाढ कशाच्या आधारावर?
नगरपंचायत क्षेत्रात आजही पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नाल्या तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांबाबत अनेक समस्या कायम आहेत. नागरिकांना अपेक्षित दर्जाच्या सुविधा मिळत नसताना कर वाढीचा निर्णय घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल विकास आघाडीने उपस्थित केला आहे. प्रथम नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यानंतरच कर निर्धारणाचा विचार करावा, अशी भूमिका आघाडीने घेतली आहे.
कर वाढीचा फेरविचार करून नागरिकांना दिलासा द्या
नागरिकांची आर्थिक परिस्थिती, दुष्काळाचे संकट आणि नगरपंचायत क्षेत्रातील उपलब्ध नागरी सुविधांचा वस्तुनिष्ठ विचार करून प्रस्तावित कर वाढीचा फेरविचार करावा. अन्यायकारक कर निर्धारण रद्द करून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी निलडोह विकास आघाडीने प्रशासनाकडे केली आहे.
३ नोव्हेंबर रोजी मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र सादर करताना विरोधी पक्षनेते संदीप नेहारे, नगरसेवक प्रदीप फलके, हिसार रत्नसेन डहाट, प्रज्ज्वल तिरपुडे, नगरसेविका अमिता उके, निशा वासनिक, चैतराम बिसेन, दुर्गाप्रसाद चित्रीव, मनोहर सोनुले, विनोद कडू, शिला श्रावन पुष्पतोडे, शुभम् पुष्पतोडे, राकेश सोनवाने, विक्की कनोजे, मुन्ना शेंडे, राहुल डोंगरे, शंकर हाडगे, मोहम्मद रोठा, पायल डोंगरे, छिपेकर काकाजी आदी उपस्थित होते.
आता निलडोह विकास आघाडीच्या या मागणीवर नगरपंचायत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे निलडोहमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
का टा वृत्तसेवा | रजत डेकाटे : 📲 9421535724






