🔥 राऊळगाव येथे बारूद कारखान्यात रक्तरंजीत होळी
एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये भीषण स्फोट
16 महिला कामगारांसह 19 जणांचा होरपळून मृत्यू, 16 गंभीर भाजले
सुरक्षा साधनांचा अभाव, आपत्कालीन व्यवस्थेचा शून्य कारभार – मालकाच्या निष्काळजीपणाचा बळी
का टा वृत्तसेवा I राऊळगाव (जि. नागपूर) :
होळीच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव लगत येनवरा येथे घडलेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. नागपूर–काटोल महामार्गावर नागपूरपासून 40 कि. मी. वर कळमेश्वर तालुक्यातील राऊळगांव लगतच्या येनवरा येथे एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) या स्फोटकनिर्मिती करणाऱ्या कारखान्यात आज सकाळी 7 ते 7.30 वाजताच्या सुमारास डिटोनेटर तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान अचानक प्रचंड स्फोट झाला.
हा स्फोट इतका भीषण होता की कारखान्यात काम करणाऱ्या 19 कामगारांचा अक्षरशः कोळसा झाला, तर 16 कामगार गंभीररीत्या भाजले गेले आहेत. मृतांमध्ये 16 महिला व 3 पुरुष कामगारांचा समावेश आहे. जखमींवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मृतदेहांची ओळख डीएनएद्वारे
स्फोटाची तीव्रता इतकी होती की अनेक मृतदेह विच्छेदनाच्या पलीकडे गेले आहेत. त्यामुळे नातेवाइकांचे रक्तनमुने घेऊन डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. घटनास्थळी सर्वत्र जळालेला ढिगारा, रक्ताचे डाग आणि भीषण शांतता पसरली होती.
डिटोनेटर क्रिम्पिंग प्रक्रियेदरम्यान स्फोट
कंपनीतील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डिटोनेटरच्या अंतिम टप्प्यातील क्रिम्पिंग प्रक्रियेदरम्यान अचानक स्फोट झाला. हे डिटोनेटर नॉन-इलेक्ट्रिक प्रकारातील असून धक्क्यामुळे (शॉक इफेक्ट) स्फोट होतो. अत्यल्प प्रमाणात स्फोटक असले तरी निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाड जीवघेणा ठरतो, हे या दुर्घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.
35 हून अधिक कामगार होते ड्युटीवर
नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनेला दुजोरा देताना सांगितले की, स्फोट झाला तेव्हा कारखान्यातील विविध युनिटमध्ये 35 पेक्षा अधिक कर्मचारी काम करत होते. त्यामुळे मृत व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अग्निशमन व्यवस्थेचा अभाव – स्थानिकांनीच केली मदत
घटनेनंतर अग्निशमन यंत्रणा आणि पाण्याची कोणतीही तत्काळ आपत्कालीन व्यवस्था नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कळमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे व त्यांच्या सहकाऱ्यांनी, तसेच स्थानिक नागरिकांनी जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा व ढिगारा उपसण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या वेळेवर पोहोचण्याबाबत मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सुरक्षा साधनांशिवाय काम – कामगारांचे गंभीर आरोप
या दुर्घटनेनंतर समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कामगारांना कोणतीही वैयक्तिक सुरक्षा साधने देण्यात येत नव्हती. हेल्मेट, सेफ्टी बूट, जॅकेट्स, अग्निरोधक कपडे यांचा पूर्ण अभाव होता, असा आरोप कामगारांनी केला आहे. यामुळेच एवढी मोठी जीवितहानी झाल्याचे स्पष्ट होत आहे.

मदतीची घोषणा
राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये, तर केंद्र सरकारकडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, पेसो व डिश विभागांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
निष्कर्ष
ही घटना केवळ अपघात नसून कारखाना मालकाची बेफिकिरी, सुरक्षेतील ढिसाळपणा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचे रक्तरंजित फळ आहे. होळीच्या पूर्वसंध्येला 19 कुटुंबांच्या आयुष्यात अंधार पसरला असून, स्फोटक कारखान्यांमधील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
जबाबदारांवर कठोर कारवाई होणार का, हा प्रश्न आता जनतेसमोर उभा आहे.









Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0