एसबीएल एनर्जी स्फोट प्रकरण : मृतांचा आकडा 22 वर

एसबीएल एनर्जी स्फोट प्रकरण : मृतांचा आकडा 22 वर,

मालक संजय चौधरीसह संचालक फरार; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

नागपूर, दि. 9 मार्च :
काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके व दारूगोळा तयार करणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा आता 22 वर पोहोचला आहे. सोमवारी (9 मार्च) उपचारादरम्यान सीमा विजय धुर्वे (रा. झिल्पा, ता. काटोल) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्घटनेतील मुख्य आरोपी आणि कंपनीचे मालक संजय चौधरी यांच्यासह इतर काही संचालक अजूनही फरार असल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

1 मार्च 2026 रोजी राऊळगाव येथील या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 18 कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता, तर 24 कामगार गंभीररीत्या भाजले होते. जखमींवर नागपूरमधील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान आतापर्यंत रंजना उत्तम घागरे (वय 35), दुर्गा केशव शेवतकर (वय 43), आम्रपाली कालसर्पे आणि सीमा विजय धुर्वे यांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 22 वर गेला आहे. उर्वरित जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

या प्रकरणात कंपनीचे संचालक रवि प्रकाशचंद्र कामरा (वय 65) आणि राकेश सुदर्शन तिवारी (वय 61) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी मुख्य आरोपी संजय चौधरीसह इतर संचालक फरार आहेत.

कामगार संघटनांचा संताप

दरम्यान, या भीषण दुर्घटनेनंतर कामगार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कारखान्यात सुरक्षा मानकांची कोणतीही प्रभावी तपासणी न करता केवळ कागदोपत्री परवानगी देणाऱ्या संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी संघटनांनी केली आहे.

कामगारांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंपनी व्यवस्थापनासोबतच सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि तपासणी न करता उत्पादनास परवानगी देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले पाहिजे, असे संघटनांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

जखमींवर उपचार सुरू

नागपूरमधील ऑरेंज सिटी हॉस्पिटलसह इतर रुग्णालयांत सध्या 20 जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये ज्योती धुर्वे, वर्षा टेकाम, सीमा वाघाडे, रितू सालमा, रोशनी उमाटे, काजल कोराटी, उषा रेवतकर, वैशाली गणेश सातई, मनीषा धुर्वे, सुजाता विनायक रक्षित, मयुरी धुर्वे, सुनीता उईके, वैशाली धुर्वे, दुर्गा मनोज घाटे आणि कविता उईके यांचा समावेश आहे.

दरम्यान, मुख्य आरोपी अजूनही फरार असल्याने पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची याबाबत सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे.

0
0

Leave a Reply

Realted News