त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकाला मारहाण; सुरक्षारक्षक निलंबित
— श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना धडा कधी?
नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाला सुरक्षारक्षकांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. भक्तीच्या नावाखाली चालणाऱ्या व्यवस्थेचा खरा चेहरा या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाला असून अखेर चौघा सुरक्षारक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱ्या सामान्य भाविकांशी अशी अमानुष वागणूक देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भक्ती, श्रद्धा आणि धार्मिक भावनांचा बाजार मांडत सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना आता कायद्याचा चाबूक दाखवण्याची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
घटनेनंतर त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टकडून तातडीने बैठक घेण्यात आली. मंदिरात येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक सूचना देण्यात आल्या. दरम्यान, राज्य शासनाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक बाबासाहेब पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
प्रांताधिकाऱ्यांची पाहणी
प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन मंदिर व्यवस्थापन आणि सुरक्षा प्रमुखांसोबत चर्चा केली. मंदिर परिसराची पाहणी करून घटनेची सखोल माहिती घेतली असून यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे.
न्यायालयाचीही गंभीर दखल
या घटनेची देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, ट्रस्टकडून असा दावा करण्यात आला आहे की, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ अपूर्ण आहे. मारहाणीचा भाग दिसत असला तरी घटनेचा संपूर्ण संदर्भ दाखवणारा व्हिडिओ अद्याप समोर आलेला नाही.
मात्र या प्रकरणात केवळ सुरक्षारक्षकच नव्हे तर देवस्थान ट्रस्टच्या कामकाजाचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाविकांवर हात उचलणाऱ्यांना धडा हवा
देवदर्शनासाठी दूरदूरून येणाऱ्या भाविकांना देवाऐवजी मारहाण मिळत असेल, तर ही व्यवस्था नेमकी कोणासाठी आहे असा सवाल उपस्थित होत आहे. मंदिर व्यवस्थापनातील ढिसाळपणा, सुरक्षारक्षकांचा उन्मत्तपणा आणि श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेली लूट याला लगाम घालणे आता अत्यावश्यक झाले आहे.
भक्तीचा, श्रद्धेचा बाजार मांडून सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशाची लुबाडणूक करणाऱ्या भामट्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. तसेच भाविकांवर हात उचलणाऱ्या अशा फालतू सुरक्षारक्षकांना कायद्याची कठोर शिक्षा होऊन भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची ठोस हमी प्रशासनाने द्यावी, अशी संतप्त मागणी भाविकांकडून होत आहे.









