कारंजा: यूपीएससी उत्तीर्ण प्रज्वल नासरेसह दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल

क्षत्रिय माळी समाज कारंजा तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

शेतकरी-कष्टकऱ्यांची मुलेही जिल्हाधिकारी होऊ शकतात : डॉ. प्रा. नरेशचंद्र काठोळे

कारंजा घाडगे | ३० जून :
                        शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील मुले-मुलीही जिद्द, परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर जिल्हाधिकारी होऊ शकतात, असा विश्वास मिशन आयएएस, अमरावतीचे संचालक डॉ. प्रा. नरेशचंद्र काठोळे यांनी व्यक्त केला. ते क्षत्रिय माळी समाज, कारंजा तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

                        क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीवर्ष महोत्सवानिमित्त तसेच छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जयंती पर्वानिमित्त श्री गुरुदेव सेवा संस्थान, कारंजा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास वानखडे होते.

                         कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल, गुलाबपुष्प व पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.

                         यावेळी सुरेशराव भांगे (माजी वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष), प्रभाकरराव देशमुख (अध्यक्ष, महात्मा फुले शिक्षण संस्था, सारवाडी), प्रेमदास मोहोड (माजी मुख्याध्यापक, भारत शिक्षण संस्था आर्वी अंतर्गत मॉडेल हायस्कूल), अरुणा चाफले (अध्यक्ष, राष्ट्रीय युवा उदय शिक्षण संस्था, नागपूर), शरद बोके (अध्यक्ष, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कारंजा) आणि प्रेमसिंह महिले (अध्यक्ष, मनुविद्या शिक्षण संस्था, कारंजा) यांची प्रमुख उपस्थिती होती.

                        मिशन आयएएसचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कारंजाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विलास वानखडे यांचा डॉ. काठोळे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

                        यावेळी कारंजा तालुक्यातील प्रथम यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी प्रज्वल धनराज नासरे (ठाणेगाव) तसेच सीईटी व आयएसआय परीक्षा उत्तीर्ण श्रीजीत चेतक भोकरे (कारंजा) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

                        दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये श्रुजल जाधव (गुरुकुल), प्रगती चोपडे (मॉडेल हायस्कूल), वल्लवी खवशी (राजीव गांधी स्कूल), क्रिष्णा जसानी (सनशाईन स्कूल), समृद्धी डोबले (कस्तुरबा विद्यालय) आणि कनिष्का देशभ्रतार (इंदिरा कन्या विद्यालय) यांचा गौरव करण्यात आला.

                        बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये रितेश खवशी (विज्ञान शाखा), अस्मिता येसनसुरे (कला शाखा), हितांशी मदनकर (वाणिज्य शाखा), शैलेश घागरे (एमसीव्हीसी), योगेश्वरी भांगे (राजीव गांधी ज्युनिअर कॉलेज – विज्ञान) आणि भोला सातपुरे (कस्तुरबा – कला शाखा) यांचा सत्कार करण्यात आला.

                        स्वागतगीत सादर करणाऱ्या महिला संचाचा तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालनाबद्दल ज्योती यावले यांचा गौरव करण्यात आला. यशस्वी आयोजनासाठी प्रभाकर बनकर, संजय कदम आणि चेतक भोकरे यांनाही शाल, गुलाबपुष्प व पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

                       यूपीएससी उत्तीर्ण प्रज्वल नासरे यांनी मनोगतात, “परिस्थितीशी झुंज द्या, कर्म करताना माणुसकी जपा आणि चांगला माणूस बना,” असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना दिला. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

                       कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास वानखडे, सूत्रसंचालन ज्योती यावले, तर आभार प्रदर्शन संजय कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षत्रिय माळी समाज कारंजाचे अध्यक्ष प्रभाकरराव बनकर, संजय कदम, अजय भोकरे आणि किरण मानकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

0
0

Leave a Reply

Realted News