कृषी केंद्रांचा खत काळाबाजार तपास यंत्रणांच्या रडारवर

कलमेश्वर तालुक्यातील सात कृषी केंद्रांचा खत काळाबाजार उघड

कारवाईची मागणी, उपोषणाचा इशारा

कलमेश्वर | प्रतिनिधी : कलमेश्वर तालुक्यात खत विक्रीतील कथित काळाबाजार प्रकरण उघडकीस आले असून सात कृषी केंद्रांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्याने प्रशासनाकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाने वेग घेतला आहे. संबंधित कृषी अधीक्षकांनी कर्तव्यात कसूर करून एका विशिष्ट खत व्यापाऱ्याला पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात येत असून, शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तक्रारीनुसार, संबंधित व्यापारी राजकीय पाठबळाचा दावा करत परिसरात दहशत निर्माण करत आहे. त्याच्यावर यापूर्वीही आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असून, तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नव्हे तर प्रशासनाने केलेले ‘सील’ तोडण्याचे धाडसही त्याने केल्याचा आरोप आहे. तक्रार करणाऱ्यांना धमक्या दिल्याचाही गंभीर मुद्दा पुढे आला आहे.

दरम्यान, ९ एप्रिल रोजी अवैध खत विक्रीबाबत माहिती देण्यासाठी संबंधित कृषी अधीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. ही बाब संशयास्पद असून, व्यापारी आणि अधिकाऱ्यांमधील संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर सातही कृषी केंद्रांची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली असून प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा

सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तरारे यांनी इशारा दिला आहे की, निर्धारित कालावधीत कारवाई न झाल्यास ३० एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. “हा प्रश्न केवळ खताचा नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा आहे. प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असून, राजकीय हस्तक्षेप झुगारून निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे.

0
0

Leave a Reply

Realted News