बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; ‘मुद्द्यांच्या लढाईसाठी धनुष्यबाण हाती’

बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; ‘मुद्द्यांच्या लढाईसाठी धनुष्यबाण हाती’

मुंबई : प्रतिनिधी
‘प्रहार’ संघटनेचे आक्रमक नेतृत्व आणि सामान्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश करत आपल्या राजकीय प्रवासाचे नवे पर्व सुरू केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या वेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “पदासाठी नव्हे, तर मुद्द्यांच्या लढाईसाठी आम्ही धनुष्यबाण हाती घेतला आहे. झेंडा बदलला असला, तरी अजेंडा तोच राहणार आहे.” शेतकरी व दिव्यांगांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे लढा देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

तुकडोजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करत कडू म्हणाले की, “ग्रामगीतेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संतांच्या जयंतीदिनीच आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेसोबत नवा प्रवास सुरू करत आहोत. माझी राजकीय सुरुवातही शिवसेनेतूनच झाली होती.”

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचेही कौतुक केले. “शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्वसामान्यांसाठी दरवाजे सदैव खुले ठेवले. दिव्यांग मंत्रालयाची स्थापना व शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय उल्लेखनीय आहेत,” असे ते म्हणाले.

दिव्यांग मंत्रालयाचे बळकटीकरण, शेतकऱ्यांसाठी हमीभाव, पेरणी ते कापणीपर्यंत मदत, विधवा महिलांचे प्रश्न, कामगार व युवकांसाठी स्वतंत्र धोरण अशा विविध मुद्द्यांवर लढा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या पक्षप्रवेशासोबतच बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


0
0

Leave a Reply

Realted News