महाराष्ट्रात गॅससाठी नागरिकांच्या रांगा;
अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्तात वितरण
आखाती तणावाच्या पार्श्वभूमीवर सिलिंडर मिळवण्यासाठी गर्दी;
प्रशासनाकडून संयम राखण्याचे आवाहन
नागपूर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता राज्यातील गॅस पुरवठ्यावर उमटू लागल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून काही ठिकाणी वितरणादरम्यान गोंधळ टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्तात सिलिंडरचे वाटप करण्यात येत आहे.
गॅस उपलब्ध होणार नाही या भीतीपोटी नागरिक मोठ्या प्रमाणात एजन्सी आणि वितरण केंद्रांकडे धाव घेत असल्याने अनेक ठिकाणी गर्दीचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच वितरण केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संभाव्य तुटवड्याच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये घाईगडबड दिसून येत असली तरी महसूल प्रशासनाने वितरण व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. प्रत्येकाला घरगुती गॅस उपलब्ध करून दिला जाईल, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागपुरात उन्हात ग्राहकांची प्रतीक्षा
नागपूरमध्येही घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. प्रशासनाकडून तुटवडा नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गोडाऊनबाहेर भर उन्हात ग्राहकांची गर्दी होत आहे. नुकतीच सिलिंडरची गाडी आल्यामुळे काही ठिकाणी पुरवठा सुरू झाला असला तरी भविष्यात टंचाई निर्माण होईल या भीतीने अनेक ग्राहक आगाऊ सिलिंडर घेण्यासाठी एजन्सीकडे धाव घेत आहेत. दरम्यान, गॅसचा प्रत्यक्ष तुटवडा नसून वितरण व्यवस्थेतील काही तांत्रिक अडचणींमुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण गॅस एजन्सी चालकांनी दिले आहे.
गॅसटंचाई नाही; व्यावसायिक गॅसवाटपासाठी क्षेत्रनिहाय टक्केवारी निश्चित – मुख्यमंत्री
सिलिंडरसाठी रांगा लावून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; फडणवीसांची टीका
नागपूर : राज्यात घरगुती एलपीजी गॅसची कोणतीही टंचाई नसून पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. काहीजण जाणीवपूर्वक सिलिंडरसाठी रांगा लावून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली.
नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकार आणि गॅस कंपन्यांनी घरगुती वापरासाठी आवश्यक तेवढा गॅस नियमितपणे पुरवला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. काँग्रेस पक्ष लोकांच्या मनात भीती निर्माण करून रांगा लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, राज्यातील काही भागांत गॅस बुकिंग करूनही सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना गॅस एजन्सीसमोर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा मर्यादित असल्याने मागणीनुसार त्वरित पुरवठा करणे कठीण होत असल्याचे गॅस एजन्सीधारकांनी सांगितले.
व्यावसायिक गॅस वाटपासाठी क्षेत्रनिहाय टक्केवारी :
-
१०० टक्के पुरवठा : रुग्णालये, शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी, वृद्धाश्रम, अनाथालय
-
७० टक्के पुरवठा : हॉटेल्स, रेस्टॉरंट, उपाहारगृहे, संरक्षण क्षेत्र, शासकीय व सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलीस व तुरुंग विभाग
-
५० टक्के पुरवठा : औषध उद्योग, बीज प्रक्रिया उद्योग, मत्स्यपालन क्षेत्र, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उपाहारगृहे
सरकारकडून आवश्यक सेवा अबाधित ठेवण्यासाठी व्यावसायिक गॅसचे हे क्षेत्रनिहाय वाटप निश्चित करण्यात आले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.









Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0