तुटवडा गॅसचा, शॉक विजेचा : पर्यायी इलेक्ट्रिक साधनांच्या वापरामुळे वीजबिल वाढण्याची शक्यता
नागपूर : शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगडी, एअर फ्रायर, ओव्हन, राईस कुकर, रोटी मेकर यांसारख्या उपकरणांचा वापर वाढला आहे. यामुळे येत्या महिन्यांत वीजबिलात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पंखे, कुलर आणि एसीचा वापरही वाढला आहे. परिणामी, पुढील तीन महिन्यांत नेहमीच्या तुलनेत जास्त वीजबिल येण्याची शक्यता आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे पर्यायी इलेक्ट्रिक साधनांचा वाढलेला वापर आणि उन्हाळ्यातील वीज उपकरणांचा वाढता वापर या दोन्ही कारणांमुळे नागरिकांवर दुहेरी आर्थिक ताण पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
महिन्याला 300 ते 1000 रुपयांपर्यंत वाढ शक्य
साधारणपणे 1200 वॅट क्षमतेच्या इंडक्शनवर सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी अर्धा ते पाऊण तास स्वयंपाक केल्यास दररोज अंदाजे तीन युनिट वीज खर्च होते. सध्या सरासरी वीजदर सुमारे 7 रुपये प्रति युनिट असल्याने रोज सुमारे 21 रुपयांचा खर्च येतो. महिनाभर असा वापर झाल्यास जवळपास 630 रुपयांची अतिरिक्त वीज वापराची नोंद बिलात होऊ शकते.
याशिवाय एअर फ्रायर, ओव्हन, राईस कुकर यांसारख्या इतर इलेक्ट्रिक उपकरणांच्या वापरामुळे महिन्याला आणखी 100 ते 300 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साधारणपणे 1000 रुपये वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना पुढील महिन्यांत किमान 1500 रुपयांपर्यंत बिल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उन्हाळ्यात वाढतो वीज वापर
एप्रिल आणि मे महिन्यात तापमान वाढल्याने पंखे, कुलर आणि एसीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. परिणामी वीज वापर वाढून बिलातही वाढ होते.
“कोणतेही इलेक्ट्रिक उपकरण वापरले की त्यानुसार वीज वापर वाढतो आणि त्याचा परिणाम बिलावर होतो. ग्राहकांनी जितकी वीज वापरली तितकेच बिल येते,” अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
कोळशाच्या दरातही वाढ
गॅसच्या टंचाईमुळे काही ठिकाणी कोळशाच्या शेगड्यांचा वापरही वाढला आहे. मागील दोन दिवसांत 35 रुपये किलो दराने मिळणारा कोळसा 45 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. लहान हॉटेल, स्टॉलधारक आणि खानावळींमध्ये कोळशाचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात कोळशाचा तुटवडा निर्माण होऊन दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0