महाराष्ट्र होरपळणार!
राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट;
पारा 46 अंशांच्या पार जाण्याची शक्यता
नागपूर : राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांना कडक उन्हाचा मोठा फटका बसत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून, India Meteorological Department च्या पुणे हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील 72 तास राज्यासाठी अत्यंत कडक उन्हाचे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अकोला-नंदुरबारमध्ये तापमान 45 अंशांच्या पुढे
राज्यात उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र झाला असून, विशेषतः अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 45.3 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या वर कायम असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले असून, उकाडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात पुढील चार ते पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होऊन काही भागांत ‘यलो अलर्ट’ कायम राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
विदर्भासाठी विशेष यलो अलर्ट
Regional Meteorological Centre Nagpur ने संपूर्ण विदर्भासाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मे महिन्याच्या उत्तरार्धात विदर्भाला पुन्हा एकदा तीव्र उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची चिन्हे असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव कमी; तापमानात 6 अंशांपर्यंत वाढ शक्य
सध्या विदर्भात उष्णतेच्या लाटेसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव कमी झाल्याने उत्तरेकडील राज्यांतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात मोठी वाढ होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
आगामी काही दिवसांत विदर्भातील तापमानात 4 ते 6 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता असून, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 45 ते 46 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ पुन्हा एकदा तीव्र उष्णतेने होरपळून निघण्याची शक्यता आहे.








