अमरावतीत एसटी बस–ऑटोचा भीषण अपघात; शाळकरी मुलीसह पाच जणांचा मृत्यू, तिघे गंभीर
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुका येथे आज सकाळी भीषण अपघात घडला. वरूड–राजुरा बाजार मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ भरधाव इलेक्ट्रिक एसटी बसने प्रवासी ऑटोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात १३ वर्षीय शाळकरी मुलीसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एसटी बस वरूडहून वर्ध्याच्या दिशेने जात होती. दरम्यान, राजुरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ समोर असलेल्या प्रवासी ऑटोला बसने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ऑटोचे अक्षरशः दोन तुकडे झाले. अपघातानंतर घटनास्थळी हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले.
मृतांची नावे
या अपघातात माही प्रविण मांगुळकर (वय १३, रा. वाडेगाव), कैलास घनश्याम नागदेवे (वय ४२, रा. वाडेगाव), हरीभाऊ दौलत शिंदे (वय ८३, रा. वघाळ), चिंतामन सदाशिवराव नागदेवे (वय ६०, रा. वाडेगाव) यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघातात जखमी झालेल्या तीन ते चार प्रवाशांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
चालक पोलिसांच्या ताब्यात
अपघाताची माहिती मिळताच वरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटी बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून, अपघाताच्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, वेगावर नियंत्रण नसल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परिसरात शोककळा
शाळकरी विद्यार्थिनीसह एकाच गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने वाडेगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील रस्ते सुरक्षा, वेगमर्यादेची अंमलबजावणी आणि वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.








