Chandrapur : माहेरी आलेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

माहेरी आलेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

धारदार शस्त्राने हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

धोपटाळा कामगार वसाहतीतील घटना; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

चंद्रपूर, प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील वेकोलि धोपटाळा कामगार वसाहतीमध्ये एका 36 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह घरात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मृत महिलेचे नाव शितल रणधीर कुंभारे (वय 36) असे आहे. त्या काही दिवसांपूर्वी उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त आपल्या लहान मुलीसह माहेरी, धोपटाळा टाऊनशिपमधील क्वॉर्टर क्रमांक 52/2 येथे आल्या होत्या.

माहितीनुसार, घटनेच्या दिवशी शितल कुंभारे यांची आई व भाऊ देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात शितल आणि त्यांची लहान मुलगी अशा दोघीच उपस्थित होत्या.

सकाळी मुलीला आढळला मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून शितल कुंभारे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा संशय आहे. गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला.

सकाळी लहान मुलगी झोपेतून उठल्यानंतर तिला आई घरात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसली. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

विविध शक्यतांवरून तपास

माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना कौटुंबिक वाद, वैयक्तिक वैमनस्य किंवा अन्य कोणत्या कारणातून घडली का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिस निरीक्षक आसिफ रजा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके आरोपींचा शोध घेत आहेत.


महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत सहा जणांची हत्या; जुन्या वैमनस्याचा संशय

विजयपूर जिल्ह्यातील गोविंदपूर येथे भीषण हल्ला

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या विजयपूर जिल्ह्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी दुपारी झालेल्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी शेतात येऊन गोळीबार केला तसेच धारदार शस्त्रांनी हल्ला केला. मृतांपैकी पाच जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

जमिनीच्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंबांमध्ये अनेक वर्षांपासून जमिनीच्या वादावरून संघर्ष सुरू होता. 2015 मधील एका खून प्रकरणाशी संबंधित जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

0
0

Leave a Reply

Realted News