दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित शिक्षणाची यशस्वी सहल
अनुभूती इन्क्ल्युझिव्ह दिव्यांग पार्क व रमण विज्ञान केंद्राला भेट
काटा वृत्तसेवा I कळमेश्वर
समग्र शिक्षा – समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, नागपूर (प्राथमिक शिक्षण विभाग) यांच्या वतीने दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल व क्षेत्रीय भेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सहलीत 35 दिव्यांग विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक सहभागी झाले होते.
या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना अनुभूती इन्क्ल्युझिव्ह दिव्यांग पार्क, नागपूर तसेच रमण विज्ञान केंद्र येथे नेण्यात आले. अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, दैनंदिन जीवनाशी निगडित कौशल्यांचा विकास करणे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे हा या सहलीचा मुख्य उद्देश होता.
अनुभूती इन्क्ल्युझिव्ह दिव्यांग पार्कमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनुकूल रचना, खेळणी, संवेदनात्मक साधने, तसेच शारीरिक व बौद्धिक विकासास पूरक उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांना समावेशक समाजाची जाणीव होऊन स्वावलंबन, सामाजिक सहभाग आणि आत्मसन्मान वाढीस लागला.
रमण विज्ञान केंद्रात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग, मॉडेल्स व प्रदर्शनांद्वारे विज्ञानाची गमतीशीर ओळख करून घेतली. “खेळता-खेळता शिकणे” या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना मिळाली. विज्ञान दैनंदिन जीवनाशी कसे जोडलेले आहे, याची समज त्यांना सोप्या पद्धतीने झाली.

या विशेष सहलीसाठी निघालेल्या बसला कळमेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुश मोटवानी (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, विस्तार अधिकारी सुशील बनसोड, उमेशसिंग कच्छवाह व अनिल कानफाडे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा देत बसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
सहलीच्या यशस्वी आयोजनात विशेष शिक्षक हेमंत वाईकर, राणी कराळे, रोशनी फुलझले, जयमाला म्हरसकोल्हे, कीर्ती इटनकर, भारती कडू, आकाश रामटेके, संजय मेश्राम, माधुरी जाधव व बाळू करमनकर यांनी मोलाचे सहकार्य केले. पालकांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा शैक्षणिक व अनुभवाधारित सहली दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.
ही सहल दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केवळ एक भ्रमंती न राहता शिकण्याचा, अनुभव घेण्याचा आणि आत्मविश्वास वाढवण्याचा प्रेरणादायी उपक्रम ठरली, असे सर्व स्तरांतून गौरवोद्गार व्यक्त करण्यात येत आहेत.












