”अशोक खरात”चा ‘एन्काउंटरचा कट रचला जाऊ शकतो’ : तृप्ती देसाईं

अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; ‘एन्काउंटरचा कट रचला जाऊ शकतो’

तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा

मुंबई : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे आणि धक्कादायक वळण समोर आले असून, भूमाता ब्रिगेडच्या Trupti Desai यांनी खळबळजनक दावा केला आहे. खरातचे संबंध बड्या राजकारण्यांशी असल्याने त्यांची नावे बाहेर येऊ नयेत, यासाठी त्याचा ‘एन्काउंटर’ करण्याचा कट रचला जाऊ शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

महिलांवरील लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या अशोक खरातकडून तपासादरम्यान सुमारे १०० आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात त्याचा सहकारी नीरज जाधव यालाही अटक करण्यात आली असून, विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी सुरू आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या की, अशोक खरातचे अनेक मंत्री आणि राजकारण्यांशी संबंध असल्याने अनेकांचे गुपित उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याला संपवण्याचा कट रचला जाऊ शकतो. “हे संबंध उघडकीस येऊ नयेत म्हणून एन्काउंटरचा मार्ग अवलंबला जाऊ शकतो,” असा आरोप त्यांनी केला.

अशोक खरातची पोलिस कोठडी २४ मार्चपर्यंत असल्याच्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी अधिक चिंता व्यक्त केली आहे. “२४ मार्च रोजी न्यायालयात हजर करताना त्याचा एन्काउंटर होऊ शकतो आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो,” असा दावा त्यांनी केला.

तसेच, “अशोक खरातने गंभीर गुन्हे केले असून, त्याला कायदेशीर प्रक्रियेनुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे. एन्काउंटर करून प्रकरण संपवणे योग्य नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या संदर्भात मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी लक्ष घालून कोणताही गैरप्रकार होऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणात Rupali Chakankar यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती आणि त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर देसाई यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्याची मागणी उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्याकडे केली आहे.

या प्रकरणातील सातत्याने होणाऱ्या नव्या खुलाशांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News