स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचेवर

शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई, प्रतिनिधी : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.

सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शनासाठी मुंबईतील त्यांच्या ‘कासा ग्रांडे’ या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर, कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना मानवंदना देत सशस्त्र सलामी दिली.

अंत्यसंस्कारावेळी बॉलिवूडमधील गायकांनी ‘अभी ना जाओ छोड़कर…’ हे त्यांचे गाजलेले गाणे गाऊन भावपूर्ण निरोप दिला. वातावरण अत्यंत भावुक झाले होते.

८२ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत आशा भोसले यांनी २० हून अधिक भाषांमध्ये १२,००० पेक्षा जास्त गाणी गायली. त्यांच्या नावावर नऊ फिल्मफेअर पुरस्कारांसह १०० हून अधिक सन्मान आहेत. देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.

त्या शास्त्रीय गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आणि प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहिण होत्या. लहान वयातच वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी गायनाची वाट धरली. अवघ्या १०व्या वर्षी त्यांनी पहिले गाणे गायले.

‘इन आंखों की मस्ती’, ‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आजा’ आणि ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी त्यांची अजरामर गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

0
0

Leave a Reply

Realted News