देशासाठी काळा दिवस!
उत्तर प्रदेशात चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाचा कहर; 89 जणांचा मृत्यू,
53 गंभीर जखमी, 114 जनावरे दगावली
लखनऊ | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारी (13 मे 2026) रात्री आलेल्या भीषण चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 89 जणांचा मृत्यू झाला असून 53 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच 114 जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
फतेहपूर, प्रयागराज, प्रतापगढ, भदोही, देहात, चंदौली, सोनभद्र, बरेली, मिर्झापूर, बदाऊन, उन्नाव आणि कानपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने थैमान घातले. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली, घरांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला.
प्रयागराज जिल्ह्यात सर्वाधिक हानी झाली असून तेथे एकट्या 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले असले तरी मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.

वित्त व महसूल विभागाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी विनिता सिंह यांनी सांगितले की, सर्व तालुक्यांकडून नुकसानाची माहिती संकलित केली जात आहे. मृतांचा आणि नुकसानीचा अंतिम आकडा अद्याप स्पष्ट झालेला नसून हानी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आधीच अलर्ट जारी केला होता. मात्र, चक्रीवादळाची तीव्रता एवढी मोठी असेल, याचा अंदाज प्रशासनासह नागरिकांनाही नव्हता. काही मिनिटांतच परिस्थिती भीषण बनली आणि अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले.
या आपत्तीचे काही धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामधून परिस्थितीची गंभीरता स्पष्ट दिसून येत आहे. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, नुकसानग्रस्त नागरिकांनी शासनाकडे तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी केली असून काही ठिकाणी सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.









