‘कॉक्रोच जनता पार्टी’ अकाऊंट प्रकरणावरून नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा
आयबी अहवालानंतर कारवाईचा आरोप; फडणवीसांचा वंदे भारत प्रवास ‘रीलसाठी स्टंट’ असल्याची टीका
मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या सोशल मीडिया अकाऊंटवरील कारवाईवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. संबंधित अकाऊंट ब्लॉक आणि हॅक करण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणा (IB) असल्याचा दावा करत, सरकार विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, देशात सरकारविरोधात वाढत्या जनक्षोभाबाबत आयबीने केंद्राला अहवाल दिल्यानंतरच संबंधित अकाऊंटवर कारवाई करण्यात आली. सोशल मीडिया अकाऊंट बंद करून जनतेचा आवाज दडपता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिर्डी दौऱ्यावरूनही पटोलेंनी टीका केली. इंधन बचतीच्या संदेशासाठी वंदे भारत एक्सप्रेसने केलेला प्रवास हा प्रत्यक्षात केवळ प्रतिमा उभारणी आणि सोशल मीडियावरील रीलसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारने दिखावूपेक्षा जनहिताचे निर्णय घ्यावेत आणि इंधन बचतीबाबत पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी मागणीही पटोलेंनी केली.









