देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; नागपूरच्या दोन महिला ठार

देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; नागपूरच्या दोन महिला ठार, ८ जण गंभीर जखमी
अक्कलकोट–पंढरपूर दर्शनानंतर परतीच्या प्रवासात भीषण अपघात;

चालकाला डुलकी आल्याने कार ट्रकवर आदळली

वर्धा, प्रतिनिधी : पंढरपूर व अक्कलकोट येथे देवदर्शन करून आनंदाने नागपूरकडे परतणाऱ्या भाविकांच्या प्रवासावर काळाने घाला घातला. तुळजापूर–नागपूर महामार्गावरील सालोड–नागठाणा परिसरात शनिवारी (२३ मे) पहाटे एका कार आणि उभ्या ट्रकदरम्यान झालेल्या भीषण अपघातात नागपूर येथील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा वर्षांच्या चिमुकल्यासह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या गजानन नगर परिसरातील महिला मंडळातील काही सदस्य आपल्या कुटुंबीयांसह इर्टिगा कारने (MH 49 U 0179) पंढरपूर आणि अक्कलकोट येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर सर्वजण नागपूरकडे परतत होते. अक्कलकोट ते वर्धा असा सुमारे ५२८ किलोमीटरचा सलग रात्रीचा प्रवास केल्यानंतर पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.

प्राथमिक माहितीनुसार, सालोड–नागठाणा परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ पोहोचताच चालकाला अचानक झोपेची डुलकी लागली. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला (UP 70 LT 0830) कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला.

अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मात्र, किशोरी संदीप उके (वय ४९) आणि मोनाली निलेश मेश्राम (वय ३७, दोघी रा. गजानन नगर, नागपूर) यांचा गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला.

अपघातात जखमी झालेल्या आठ जणांना तातडीने वर्ध्यातील सावंगी मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे समजते.

जखमींमध्ये तुषार लक्ष्मणराव जाधव (३७, चालक), तनिष चंद्रशेखर उके (६), दिव्यांशी निलेश मेश्राम (१०), आराध्य संतोष उके (१३), ईशान्य अनिल बारसकर (१७), नीता अनिल बारसकर (५५), साधना अनिल बारसकर (५६) आणि कांचन चंद्रशेखर उके (४२) यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, नागपूरचे घर अवघ्या ७२ किलोमीटर अंतरावर असताना हा दुर्दैवी अपघात घडला. देवदर्शन करून सुखरूप घरी परतण्याची अपेक्षा असताना आलेल्या या दुर्घटनेमुळे नागपूरच्या गजानन नगर परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

0
0

Leave a Reply

Realted News