हायकमांडच्या आदेशानंतर सिद्धरामय्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
डी.के. शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता; मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल अपेक्षित
बंगळूरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बंगळूरु येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, “हायकमांड जेव्हा सांगेल, तेव्हा मी राजीनामा देईन, असे मी पूर्वीच स्पष्ट केले होते. काल पक्षश्रेष्ठींनी निर्देश दिल्यानंतर आज मी राज्यपालांकडे माझा राजीनामा सादर केला.”
राज्यपाल थावरचंद गेहलोत सध्या बंगळुरूबाहेर असल्याने सिद्धरामय्या यांनी आपले राजीनामा पत्र राज्यपालांच्या सचिवांकडे सुपूर्द केले. पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे देखील उपस्थित होते. मात्र, पुढील मुख्यमंत्री कोण असतील, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
राजीनाम्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीदरम्यान डी.के. शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आलिंगन दिल्याचे दृश्य चर्चेचा विषय ठरले.
दरम्यान, राज्याचे मंत्री एच.के. पाटील यांनी डी.के. शिवकुमार यांच्या नावावर एकमत झाल्याचे सांगितले. त्यामुळे शिवकुमार हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री होण्याची शक्यता बळावली आहे.
काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांची चर्चा
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शुक्रवारी डी.के. शिवकुमार यांची नेतेपदी निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यासोबतच मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून, सुमारे 15 ते 20 नवीन मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. विद्यमान 35 मंत्र्यांपैकी जवळपास 25 मंत्र्यांना वगळले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. तसेच दोन उपमुख्यमंत्री पदांची निर्मिती करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यापैकी एक पद दलित समाजातील नेत्याला, तर दुसरे पद लिंगायत किंवा ओबीसी समाजातील नेत्याला दिले जाऊ शकते.

मुख्यमंत्री बदलामागील प्रमुख कारणे
मे 2023 मध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘रोटेशनल मुख्यमंत्री’ फॉर्म्युला ठरवल्याचे सांगितले जाते. सरकारची अडीच वर्षे पूर्ण होत असल्याने आता डी.के. शिवकुमार यांचा दबाव वाढला होता.
याशिवाय, वाल्मिकी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन घोटाळ्यासारख्या प्रकरणांमुळे सिद्धरामय्या सरकारवर टीका होत होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतृत्व बदल करून सत्ताविरोधी लाट कमी करण्याचा काँग्रेस हायकमांडचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.












