TMC खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जीवघेणा हल्ला
5 आरोपी अटकेत, द्वेषाच्या राजकारणावर पुन्हा प्रश्नचिन्ह
कोलकाता, प्रतिनिधी : पश्चिम बंगालमध्ये वाढत्या राजकीय वैमनस्याचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले असून तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे रात्रभर छापेमारी करून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करत हा केवळ अपघाती प्रकार नसून पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला. “अभिषेक यांनी हेल्मेट घातले नसते, तर त्यांचा जागीच मृत्यू झाला असता. हल्ल्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या आहेत,” असे त्या म्हणाल्या.

रुग्णालयावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप
ममता बॅनर्जी यांनी आणखी एक धक्कादायक आरोप करत सांगितले की, अभिषेक बॅनर्जी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या उपचारात अडथळे निर्माण करण्यासाठी आणि त्यांना लवकर डिस्चार्ज देण्यासाठी दबाव आणण्यात आला. भाजपशी संबंधित नेते आणि काही पोलिस अधिकाऱ्यांकडून डॉक्टर तसेच रुग्णालय प्रशासनाला धमकीचे फोन आल्याचा दावा त्यांनी केला.
“जर प्रकृती गंभीर नव्हती, तर त्यांना आयटीयूमध्ये का ठेवण्यात आले? आणि मग अचानक डिस्चार्ज का देण्यात आला?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हल्ल्यावेळी दगडफेक, अंडी व चपला फेकल्याचा आरोप
दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सोनारपूर येथे निवडणुकीनंतरच्या हिंसाचारातील पीडित TMC कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावर कथितरित्या भाजप समर्थकांनी घेराव घालत घोषणाबाजी केली. त्यानंतर दगड, अंडी आणि चपला फेकण्यात आल्याचा आरोप आहे. गोंधळात त्यांचा शर्टही फाडण्यात आला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की त्यांना हेल्मेट घालून सुरक्षित स्थळी हलवावे लागले.

लोकशाहीत मतभेद असावेत, हिंसा नव्हे
राजकीय मतभेद हा लोकशाहीचा अविभाज्य भाग असला तरी विरोधकांवर शारीरिक हल्ले करणे, त्यांना लक्ष्य करणे किंवा हिंसेचा मार्ग स्वीकारणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. कोणताही पक्ष सत्तेत असो किंवा विरोधात, राजकीय द्वेषाचे वातावरण समाजाला अधिक अस्थिर बनवते. हिंसेचे समर्थन कोणत्याही बाजूने होऊ शकत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होणे हीच नैसर्गिक न्यायाची अपेक्षा आहे.

संवेदनशील सोनारपूर पुन्हा चर्चेत
सोनारपूर परिसर हा गेल्या काही वर्षांपासून राजकीय संघर्षाचे केंद्र राहिला आहे. निवडणुकांदरम्यान आणि त्यानंतर TMC व भाजप कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा हिंसक संघर्ष घडले आहेत. याआधीही या भागात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना जीवित आणि मालमत्तेचे नुकसान सहन करावे लागले आहे.
दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू केली असून हल्ल्यामागील संपूर्ण कट उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.











