अडीच लाखांची लाच घेताना उत्पादन शुल्क निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!
एफएल-३ परवान्यासाठी तब्बल ८ लाखांची मागणी
तडजोडीनंतर अडीच लाख स्वीकारताना रंगेहात पकडले
नागपूर/अचलपूर : परवाना देण्याच्या अधिकाराचा गैरवापर करून लाचेची मागणी करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाईचा बडगा उगारला. अचलपूर येथे रेस्टॉरंट अँड बारच्या एफएल-३ परवान्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना उत्पादन शुल्क विभागाचा दुय्यम निरीक्षक आकाश दत्ता जाधव (वय ३६) याला एसीबीच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.
तक्रारदाराने रेस्टॉरंट अँड बारच्या एफएल-३ परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. आवश्यक कागदपत्रे अचलपूर येथील उत्पादन शुल्क कार्यालयात सादर केल्यानंतर आरोपी अधिकारी आकाश जाधव याने तक्रारदाराकडे एकूण आठ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यापैकी तीन लाख रुपये स्वतःसाठी आणि पाच लाख रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असल्याचे सांगण्यात आले.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १२ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर एसीबी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत एसीबीने २४ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली.
पडताळणीदरम्यान तडजोड झाल्यानंतर आरोपी अधिकाऱ्याने स्वतःसाठी अडीच लाख रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याचे एसीबीच्या कारवाईत निष्पन्न झाले. त्यानंतर अचलपूर येथील उत्पादन शुल्क कार्यालयातील त्याच्याच कक्षात सापळा रचण्यात आला. अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने आकाश जाधव याला रंगेहात ताब्यात घेतले.
लाचखोरीला ‘शॉर्टकट’ समजणाऱ्यांना एसीबीचा दणका
शासकीय कार्यालयात नागरिकांच्या कामासाठी नियमांनुसार सेवा देणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना, त्याच कामासाठी पैशांची मागणी करणे हा अधिकाराचा गंभीर गैरवापर आहे. अशा लाचखोर प्रवृत्तीमुळे प्रामाणिक नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो.
या कारवाईमुळे “शासकीय कामासाठी लाच देऊ नका आणि लाचेची मागणी झाल्यास संबंधित यंत्रणेकडे तक्रार करा” हा स्पष्ट संदेश पुन्हा एकदा समोर आला आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी परतवाडा पोलीस ठाणे, अमरावती येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, पोलीस निरीक्षक राजकिरण येवले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सामाजिक संदेश : भ्रष्टाचाराला नकार द्या!
लाच देणेही चुकीचे, लाच मागणे तर त्याहून गंभीर.
आपले शासकीय काम नियमाने आणि अधिकाराने करून घेणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास गप्प न बसता संबंधित भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेकडे तक्रार करणे गरजेचे आहे.
📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईलवर, थेट आपल्या गावातून










