गरब्यात मुस्लिम सहभागी झाले तर गैर काय?

अमृता फडणवीसांची परखड भूमिका; “शांततेने उत्सवाचा आनंद घेत असतील तर विरोधाचे कारण नाही!”

चंद्रपूर/मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेश द्यायचा की नाही, यावरून महाराष्ट्रात चर्चा रंगली असताना अमृता फडणवीस यांनी या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. “कोणत्याही समाजातील व्यक्तीला गरबा पाहायचा किंवा त्यात सहभागी व्हायचे असेल आणि ती व्यक्ती शांततेने उत्सवाचा आनंद घेत असेल, तर त्यात गैर काही वाटत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूरमध्ये त्यांना मंत्री नितेश राणे यांच्या गरब्यात मुस्लिम तरुणांना प्रवेश न देण्याच्या भूमिकेबाबत विचारण्यात आले. राणे यांनी ‘लव्ह जिहाद’चा धोका असल्याचा दावा करत गरबा आयोजकांनी मुस्लिम तरुणांना प्रवेश देऊ नये, असे म्हटले होते.

यावर अमृता फडणवीस यांनी राणे यांनी काही विचार करूनच वक्तव्य केले असावे, असे सांगितले. मात्र, गरबा हा आता केवळ एका समाजापुरता मर्यादित राहिलेला उत्सव नसून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होतो, असे त्या म्हणाल्या.

त्याचवेळी सार्वजनिक उत्सवांबाबत त्यांनी नियमांचे पालन आणि सामाजिक सलोखा यावरही भर दिला. गणेशोत्सवातील डीजे व ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलताना, उत्सव साजरा करताना सरकार आणि न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दहीहंडीतील महिलांच्या नृत्याबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवला. महिलांनी मानवी मनोरा तयार करणे हे समानतेचे प्रतीक असल्याचे सांगत, मात्र त्याच कार्यक्रमात महिलांकडून अयोग्य नृत्य करून घेणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवरात्रोत्सवापूर्वी गरबा प्रवेशाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना अमृता फडणवीस यांच्या भूमिकेमुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. 

मंत्री नितेश राणे : गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरब्यात मुस्लिमांना प्रवेश द्यायचा की नाही, यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याची मागणी होत असतानाच मंत्री नितेश राणे यांनीही ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित करत मुस्लिम तरुणांना गरब्यात प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार : अमृता वहिनींच्या भूमिकेचे स्वागत, पण फडणवीसांनी विष ओकणाऱ्या राणेंना आवरावे: दांडियाबद्दल अमृता फडणवीस यांनी चांगला विचार मांडला आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगून विष ओकणाऱ्या नीतेश राणेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढले तर त्यांच्या बोलण्यात काही तथ्य आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

 

0
0

Leave a Reply

Realted News